Join us  

दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: October 13, 2014 2:19 AM

गेल्या काही दिवसात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले त्याचबरोबर राजकीय समीकरणही बदलली असली तरी प्रतिस्पर्धी दोनच आहेत.

प्रशांत शेडगे, पनवेलगेल्या काही दिवसात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले त्याचबरोबर राजकीय समीकरणही बदलली असली तरी प्रतिस्पर्धी दोनच आहेत. ते म्हणजे माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार विवेक पाटील. पनवेलमध्ये हे दोन दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी या दोघांकरिता ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. या दोघांमध्ये कोणाचा फॅक्टर चालेल त्यांचा राजकीयदृष्ट्या विजय होणार असल्याने पनेवलमध्ये अधिक जोर लावण्यात आला आहे.रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग असले तरी राजकारणाचे केंद्रबिंदू पनवेलला आहे. या तालुक्यात जवळपास सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष राहतात. परिणामी या ठिकाणाहून पक्षाचा कारभार पाहिला जात आहे. त्याचबरोबर राजकारणी कमी व समाजकारणी म्हणून ओळखले जाणारे आमदार विवेक पाटील यांच्या वास्तव्यामुळे पनवेल हे समाज व राजकारणाचे जिल्ह्यातील केंद्रबिंदू मानले जाते. कमवा व शिका या योजनेतून शिक्षण घेऊन शिक्षकीपेशा पत्करलेल्या रामशेठ ठाकूर हे पुढे उद्योग व्यवसायात आले आणि दोनदा खासदार झाले. यापूर्वी त्यांनी कधी ग्रामपंचायतीची ही निवडणूक लढवली नव्हती. तरी सुद्धा बॅ. ए आर अंतुले, दि. बा. पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा पराभव केला. त्यानंतर २००४ साली लोकसभा न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे पक्षाने या ठिकाणी आमदार विवेक पाटील यांना संधी दिली. व रामशेठ यांनी विधानसभा लढवण्याचे त्यावेळी ठरले. मात्र या निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर शेकापचा खासदार झाला नाही. ठाकूर यांनी आपला हक्क सोडून पुन्हा विवेक पाटील यांना विधानसभेची उमेदवारी देण्याची सहमती दर्शविली व पायाला भिंगरी लावून प्रचार केला. त्यानंतर काही महिन्यातच रामशेठ ठाकूर यांनी शेकापला लाल सलाम करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान गेल्या दशकात आमदार विवेक पाटील यांनी रामशेठ ठाकूर यांना प्रत्येक ठिकाणी शह देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर त्यांनी नामोहरण करण्याची एकही संधी सोडली नाही. २००९ साली राष्ट्रवादीशी घरोबा करून प्रशांत ठाकूर यांना नगराध्यक्षपदावरून पायउतार केले. मात्र त्याचा उलटा परिणाम निवडणुकीत दिसून आला.