Join us

कार्यालयीन वेळांत बदल करण्याची विनंती; मुख्य सचिवांनी आस्थापनांना पाठवलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 5:28 AM

सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, पण दुपारी १२ ते ४ ची वेळ योग्य नाही

मुंबई : मुंबईतील लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होत आहे. सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा, अशी विनंती मुख्य सचिव यांनी यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात केली आहे. यासंदर्भातील सूचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनाही कळविण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील१ फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. त्याला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या संदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले आहे.

उद्योग, व्यवसायांना उभारणी मिळणे शक्यटप्प्याटप्प्याने सर्वांना लोकल पुन्हा सुरू करण्याच्या, रेस्टॉरंटना पहाटे १ वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकल सेवेशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाताना अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, तर रेस्टॉरंट मालकांना वेळेच्या निर्बंधांमुळे तोटा सहन करावा लागत आहे. या उपायांमुळे उद्योग, व्यवसायांना उभारणी मिळणे शक्य होईल. - शिवानंद शेट्टी, आहार

रेल्वे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. काही एक्सलेटर आणि प्रवेशद्वारे बंद होती, ती सुरू करण्यात येणार आहेत. तसेच एटीव्हीएमची संख्या वाढविण्यात येईल. - सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, पण दुपारी १२ ते ४ ची वेळ योग्य नाही. १२ वाजता रेल्वेने प्रवास सुरू केल्यानंतर कामकाज आटोपून दुपारी ४ वाजेपर्यंत लोकल पकडणे कठीण आहे. कर्मचाऱ्यांनाही या वेळेत बस आणि खासगी वाहनाने प्रवास करावा लागेल. मात्र, किरकोळ दुकाने आणि मॉल्समधील दुकाने बंद करण्याची वेळ वाढल्याने उशिरा जाणाऱ्या प्रवाशांना खरेदी करता येईल.- विरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन

 

टॅग्स :मुंबई लोकलमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस