मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका व शासन माध्यमातून शहरात तानाजी मालुसरे भवन , वारकरी भवन , डॉ . बाबासाहेब आंबेडकर भवन व हिंदी भाषा भवन ची भूमिपूजने व पालिकेने धम्म सम्राट अशोक बौद्ध विहार उभारल्याने आता ख्रिस्ती समाज भवन , केरळ भवन व दक्षिण भारतीय भवन पालिकेने बांधून देण्याची मागणी आयुक्तां कडे करण्यात आली आहे . त्यामुळे शहरातील राजकारण तापवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत .
मीरा भाईंदर महापालिकेने शासनाच्या मंजुरी नंतर सांस्कृतिक भवनच्या आरक्षणाची जागा हि आगरी समाजाच्या संस्थेस नाममात्र दराने दिली आहे . त्या ठिकाणी आगरी भवन उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे . तर महापालिकेने नुकतेच कनकिया भागात धम्म सम्राट अशोक बौद्ध विहार या नावाने मोठी वास्तू उभारली आहे . परंतु त्या वरून शहरात अन्य समाजाच्या कोणी आक्षेप घेत भवनांची फारशी मागणी केली नाही .
आता नरवीर तानाजी मालुसरे भवन , वारकरी भवन , डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन व कवी हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवनच्या भूमिपूजना नंतर मात्र विरोधाचा सूर सुरु झाला आहे . शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याने हि भूपीपूजन होत असताना सत्तेतील सहकारी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी मात्र हे पालिका नियमात नसल्याचे सांगत निवडणूक जिंकण्यासाठी लॉलीपॉप द्यायचे काम सुरु आहे अशी टीका केली होती .
त्या नंतर मेहतांचे समर्थक व पालिका निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार सजी आयपी यांनी देखील महापालिके कडे केरळ भवन , दक्षिण भारतीय भवन व ख्रिश्चन भवन बांधून देण्याची मागणी केली आहे . जर अन्य समाजाची भवने पालिका बांधून देणार असेल तर आम्ही सुद्धा ह्या शहरातले करदाते नागरिक आहोत . आम्हाला सुद्धा समाजाच्या विविध कार्यक्रमांसाठी भवनची गरज आहे . शासन व पालिका आमची मागणी मान्य करेल अशी अपेक्षा असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन वा न्यायालयीन लढ्या बाबत थोरवी असे सजी आयपी म्हणाले .
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकरणीत असलेल्या फ्रिडा मोरायस यांनी बुधवारी महापालिका आयुक्तां कडे ख्रिश्चन भवन उभारावे अशी मागणी केली आहे . फ्रिडा यांनी त्यांच्या संस्थेच्या नावाने हि मागणी केली असून पक्ष व राजकारण बाजूला ठेऊन येथील भूमिपुत्र असलेले ख्रिश्चन - कोळी यांचे समाज भवन होणे आमच्या हक्काचे आहे . ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या शहरात दिड ते दोन लाख इतकी आहे .
महानगरपालिका - राज्य सरकार तसेच आमदार निधीतून शहराला नामवंत समाजाचे भवन, सांस्कृतिक भवन व वस्तीगृह योजना पालिका राबवत आहे. त्याच धर्तीवर शहरात ख्रिस्ती भवन ,ख्रिस्ती संतांच्या नावाने वसतिगृह उत्तन मध्ये शासकीय जागेवर बांधून मिळाले पाहिजे असे फ्रिडा म्हणाल्या .