मुंबई- माजी मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना तब्येतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना १३ जुलैला दणका देत, त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन अर्ज नाकारण्यात आला होता. आता मलिक यांच्या संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे, नवाब मलिक यांना आणखी एक दिलासा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी भाजपचे मोहित कंबोज यांनी कोर्टाला विनंती अर्ज केला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. २०२१ मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलिक यांच्याविरोधात मोहित कंबोज यांनी तक्रार केली होती. २०२१ मध्ये मलिक यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत शिवडी कोर्टात हजेरी लावल्याप्रकरणी ही तक्रार केली होती. या प्रकरणी कंबोज यांनी कोर्टात विनंती अर्ज केला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
भाजप नेते मोहित कंबोज काय म्हणाले?
नवाब मलिक यांच्या विरोधातील एकही केस मी पाठिमागे घेतलेली नाही, कोणीही खोट्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. मलिक यांच्याविरोधातील माझे काम सुरूच राहणार आहे. कोर्टात या संदर्भात तारखा सुरू आहेत. त्यांच्याविरोधातील मानहानीच्या सर्व केस मी काढून घेतलेल्या नाहीत, असंही भाजप नेते मोहित कंबोज म्हणाले.
दरम्यान, आता नवाब मलिक राष्ट्रवादीतील कोणत्या गटाला पाठिंबा देणार याची चर्चा सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून नवाब मलिक यांची दोन्ही गटातील नेते भेट घेत आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. तर, आज प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर अजित पवार यांनीही त्यांची भेट घेतली. त्यामुळे, ते कोणत्या गटात जाणार याची चर्चा होत आहे. मात्र, ते तुर्तात कुठल्याही गटात किंवा पक्षात न जाता केवळ प्रकृतीवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. ''मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार आहे'', अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.
या चर्चा सुरू असताना आज भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्याची विनंती कोर्टाला केल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.