आर्यन खान प्रकरणी आरोपपत्रासाठी ९० दिवसांची मागितली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:41 AM2022-03-29T08:41:48+5:302022-03-29T08:42:12+5:30

क्रूझवरील ड्रग्स रॅकेट एनसीबीने उघडकीस आणले.

Requested 90 days for chargesheet in Aryan Khan case | आर्यन खान प्रकरणी आरोपपत्रासाठी ९० दिवसांची मागितली मुदत

आर्यन खान प्रकरणी आरोपपत्रासाठी ९० दिवसांची मागितली मुदत

Next

मुंबई : कार्डिलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीने विशेष न्यायालयाकडून ९० दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. २ एप्रिलला दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह १९ जण यामध्ये आरोपी आहेत.
एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) विशेष न्यायालयात अर्ज करत याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ मागितली. आर्यन खानला एनसीबीने २ ऑक्टोबरला अटक केली. 

क्रूझवरील ड्रग्स रॅकेट एनसीबीने उघडकीस आणले. एनसीबीने या क्रूझवरून हशीश, कोकेन आणि एमडी आदी ड्रग्स जप्त केले. आर्यन खानसह एनसीबीने मूनमून धमेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत छोकर, गोमीत चोप्रा यांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. दिल्लीतील एसआयटी पुढील महिन्याच्या अखेरीस आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.

एनसीबीने अटक केल्यानंतर आर्यन खान २५ दिवस कारागृहात राहिला. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यावर उच्च न्यायालयाने २८ ऑक्टोबरला त्याची जामिनावर सुटका केली. 
फौजदारी दंडसंहितेनुसार, गुन्हा दाखल केल्यानंतर  १८० दिवसांत आरोपींवर आरोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. 
मात्र, आवश्यकता भासल्यास तपास यंत्रणा संबंधित न्यायालयाकडून ९० दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ करू शकतात. त्यानुसार एनसीबीने आर्यन खान व अन्य आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत मागितली.

Web Title: Requested 90 days for chargesheet in Aryan Khan case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.