मुंबई : परदेशातून मुंबई विमानतळावरील कार्गो विभागात आलेल्या दोन पार्सलद्वारे केलेल्या गांजाच्या तस्करीचा सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या पार्सलद्वारे परदेशातून काही झाडे मागविल्याची कागदोपत्री नोंद होती. मात्र, तपासणीसाठी जेव्हा हे पार्सल उघडण्यात आले त्यावेळी त्यात २०४ ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणात ग्लोबेव आंद्रे नावाच्या आरोपीला गोव्यातून अटक करण्यात आली आहे.
गांजाच्या तस्करीची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या सामानाची झडती घेत ही तस्करी पकडली. मात्र, ते पार्सल इथून गोव्याला जाणार होते. त्यामुळे आरोपीला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेषांतर करत गोवा गाठले व गांजाच्या बॉक्सऐवजी एक रिकामा बॉक्स संबंधित व्यक्तीला देण्यासाठी ठेवला.
ज्यावेळी ती व्यक्ती हा बॉक्स घेण्यासाठी गोवा विमानतळावर दाखल झाली, त्यावेळी त्याच्या ओळखपत्राची तपासणी केली. मात्र, त्याच्याकडे असलेले ओळखपत्रही बोगस असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
२० हजारांच्या मोबदल्यात तस्करी
२० हजार रुपयांच्या मोबदल्यात ही तस्करी केल्याची कबुली ग्लोबेव आंद्रे याने अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर त्याला गोव्यातील स्थानिक न्यायालयात हजर करून उचित परवानग्या प्राप्त करत मुंबईला आणण्यात आले.