मुंबई : टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याची मागणी करणे चुकीचे आहे. आक्षेपार्ह संदेश, व्हिडीओबाबत केंद्र सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. तो संदेश किंवा व्हिडीओ इंटरनेटवरून काढण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान कायद्यात (आयटी अॅक्ट) तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी संपूर्ण अॅपवर बंदी घालण्याची मागणी करणे योग्य नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळावी, अशी विनंती टिकटॉकच्या वतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी न्यायालयाला केली.‘आयटी अॅक्टच्या कलम ६९-अ नुसार, एखाद्या व्यक्तीला इंटरनेटवरील मजकुरावर किंवा व्हिडीओबाबत आक्षेप असेल तर त्या व्यक्तीने केंद्र सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी आणि तो मजकूर हटविण्याची विनंती करावी,’ अशी माहिती साठे यांनी प्रभारी मुख्य न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाला दिली. कंपनीने उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश खंडपीठाने याचिकाकर्तीला दिले. हिना दरवेश या गृहिणीने टिकटॉक अॅपवर बंदी घालण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
टिकटॉक अॅपवर बंदीची मागणी करणे चुकीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 6:14 AM