मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर गर्दीच्या वेळी मोठी वाहतूककोंडी होते. त्यामुळे कांदिवली ते गोरेगाव दरम्यान गर्दीच्या वेळी अवजड वाहनांवर बंदी घाला, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
सोमवारी सकाळी ट्रकमुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. हा ट्रक थांबविण्यासाठी कांदिवली ते गोरेगाव दरम्यान कोणताही वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूककोंडी थांबविण्यासाठी सकाळी गर्दीच्यावेळी दक्षिण वाहिनीवर ट्रकला बंदी घाला, अशी मागणी उनाईज कुरेशी यांनी केली. तर सकाळी ही वाहने जाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. कोठेही आणि कोणत्याही वेळेला कसेही वाहन चालविण्याचे स्वातंत्र्य असल्यासारखे ते वागतात. तसेच हे ट्रकचालक खूप निष्काळजीपणे वाहने चालवितात, कित्येक वेळा या ट्रकच्या पुढील आणि पाठीमागच्या भागावर चिखलाचे थर असतात, परंतुते जाणीवपूर्वक तो चिखल साफ करत नाहीत, असा आरोप अनुप नागळे यांनी केला आहे. एकीकडे सुप्रशासनाच्या बाता मारल्या जात आहेत, परंतु ही वाहतूककोंडी सोडवण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे, असे अमितकुमार दास यांनी म्हटले आहे.
प्रत्येक जंक्शन, प्रत्येक सिग्नलला आमचे पोलीस कर्मचारी असतात. कधी कधी वाहने मधेच बंद पडतात. त्यामुळेही वाहतूककोंडी होते, पोलीस कर्मचारी पुढे जाऊन त्या वाहनचालकालाही मदत करतात. येथे मोठी वाहतूककोंडी असते, पण कर्मचारी नसतील तर वाहतूक नियमन केले जाणे अशक्य आहे, असे दिंडोशी वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
अवजड वाहनांवर दंड वाढविण्याची गरजबंदीच्या वेळेत जी अवजड वाहने येतात त्यांना २०० रुपये दंड आकारून कारवाई होते. दररोज ३० ते ४० वाहनांवर कारवाई केली जाते. तरीही वाहने येतात कारण दंडाची रक्कम कमी आहे. तो एक हजार किंवा दोन हजार रुपयांपर्यंत आकारला पाहिजे, तरच या प्रकाराला आळा बसू शकेल. - विजय साळुंखे, पोलीस निरीक्षक , दिंडोशी वाहतूक विभाग