सवलतीच्या कला गुणांसाठी हवी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:39+5:302021-07-08T04:06:39+5:30
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे कलागुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला खरा; मात्र राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना त्यासाठीचे प्रस्ताव शाळेत ...
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे कलागुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला खरा; मात्र राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना त्यासाठीचे प्रस्ताव शाळेत सादर करण्यासाठी २५ जून ते ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर २८ जून ते २ जुलै दरम्यान शाळांनी विभागीय मंडळांकडे हे प्रस्ताव सादर करायचे होते. मात्र ही ५ दिवसांची मुदत फारच कमी होती आणि विद्यार्थ्यांना निर्णय कळेपर्यंतच सुरुवातीचे काही दिवस गेल्याने आता सवलतीचे गुण घेण्यासाठी विद्यार्थी शाळांकडे विनंत्या करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळांना कलागुण सादर करण्यासाठी मंडळाने मुदत वाढवून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कला गुणांच्या बाबतीत कलाशिक्षक, संघटना आणि विद्यार्थी पालकांकडून अनेक निवेदने शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आली होती. अखेर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाने आपला आधीचा गुण न देण्याचा निर्णय अधिक्रमित करून नवीन निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मात्र सवलतीच्या कला गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरेशी मुदत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना जुनी प्रमाणपत्र शोधून शाळेकडे सादर करण्यासाठी उशीर झाला. बहुतांश शाळासुद्धा ५ जूनपर्यंत निकाल बनवण्यासाठी व्यस्त होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शाळांना हे गुण मंडळाकडे सादर करण्यासाठी अजून ४-५ दिवसांची मुदत किंवा एक संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शाळांकडून होत आहे.
यंदाचा निकाल हा पूर्णपणे अंतर्गत मूल्यमापनावर अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे सवलतीचे कलागुण खूप महत्त्वाचे आहेत. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेशी मुदत मिळायला हवी होती. मात्र आता शिक्षण विभागाने आणखी काही दिवसांची मुदत उपलब्ध करून दिल्यास अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ शकेल.
- शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद