मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंट हा घर खरेदीदार आणि बिल्डर यांच्यातील दुवा असून, बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंट्सच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने माहिती एजंट्कडून मिळते. अशावेळी सर्व एजंट्सना रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात आणि त्यांच्याकडून ग्राहकाला प्राथमिक माहिती देताना त्यात स्पष्टता असायला हवी म्हणून महारेराने एजंट्सच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केले आहे.
महारेराकडील माहितीनुसार ५२३ एजंट्सनी प्रशिक्षणासाठी नावे नोंदवली आहेत. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तसेच सध्याच्या एजंट्सनाही १ सप्टेंबरपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. याबाबतचा अभ्यासक्रम अखिल भारतीय स्थानिक स्वयंप्रशासन संस्थेने तयार केला आहे. राज्यात सर्वत्र सहज प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रशिक्षणाची सोय देणाऱ्या संस्थांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. एप्रिल अखेरपासून होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा आयबीपीएस संस्थेमार्फत घेतल्या जाणार आहेत.