Join us

खोल समुद्रात अडकलेल्या ५० बोटींवरील २२४ मच्छीमारांची तटरक्षक दलाकडून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 12:37 AM

सेंटरने केलेल्या या प्रयत्नांना यश आले. या परिसरातील दोन जहाजांनी तटरक्षक दलाच्या संदेशांना प्रतिसाद दिला.

मुंबई : खराब हवामानामुळे खोल समुद्रात फसलेल्या ५० मच्छीमार बोटींनी तटरक्षक दलाकडे मदतीची मागणी केल्यावर तटरक्षक दलाने तातडीने पावले उचलून ५० मच्छीमार बोटींमधील २२४ मच्छीमारांची सुखरूप सुटका केली.गोव्यापासून २५० किमी पश्चिमेकडे खोल समुद्रात मंगळवारी दुपाारच्या सुमारास अडकलेल्या मच्छीमार बोटींमधील मच्छीमारांना वाचविण्याबाबत कोलाचेल येथून मदतीचा संदेश आल्यानंतर मुंबईतील मेरीटाइम रेस्क्यू को-आॅर्डिनेशन सेंटरने त्वरित हालचाल करीत मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.सेंटरने केलेल्या या प्रयत्नांना यश आले. या परिसरातील दोन जहाजांनी तटरक्षक दलाच्या संदेशांना प्रतिसाद दिला. भारतीय तटरक्षक दलाची बोट तिथे पोहोचेपर्यंत अडकलेल्या मच्छीमार बोटींना मदत करण्याची विनंती तटरक्षक दलातर्फे करण्यात आली व त्या जहाजांच्या कप्तानाने ती मागणी मान्य केली. त्यामुळे भारतीय जहाज नवधेनू पूर्णने १५ मच्छीमारांची सुटका केली तर जपानच्या एमव्ही तोवाडा जहाजाने २२ मच्छीमारांची सुटका केली. त्यानंतर आणखी तीन जहाजांनी यामध्ये सहभाग घेत उर्वरित मच्छीमारांची सुटका केली.सुटका केलेल्या मच्छीमारांना अन्न व प्राथमिक उपचार पुरविण्यात आले. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी, सावित्रीबाई फुले, अमल, अपूर्वा ही जहाजे तटरक्षक दलाच्या विमानासोबत मदतकार्यासाठी रवाना झाली होती, अशी माहिती तटरक्षक दलाचे जनसंपर्क अधिकारी कमांडंट आर.के. सिंह यांनी दिली. तटरक्षक दलाने केलेल्या या मदतीसाठी मच्छीमारांनी त्यांचे आभार मानले.

टॅग्स :मुंबई