खाडीत बोट रुतून अडकलेल्यांची सुटका
By admin | Published: February 18, 2015 02:40 AM2015-02-18T02:40:07+5:302015-02-18T02:40:07+5:30
न्हावा गावचे भाविक घारापुरी येथे जात असताना त्यांची बोट गाळामध्ये अडकली. ओहोटी असल्याने पाणी कमी होऊन गाळामध्ये ही बोट सुमारे एक तास अडकली होती.
नवी मुंबई : न्हावा गावचे भाविक घारापुरी येथे जात असताना त्यांची बोट गाळामध्ये अडकली. ओहोटी असल्याने पाणी कमी होऊन गाळामध्ये ही बोट सुमारे एक तास अडकली होती. अखेर सागरी पोलिसांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
महाशिवरात्र असल्याने घारापुरी येथील शंकराच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी न्हावा गावचे भाविक बोटीने जात होते. न्हावा गाव येथून निघालेल्या या बोटीमध्ये ७८ भाविक होते. पण सागरी प्रवासात ही बोट खाडीमधील गाळात अडकली.
संध्याकाळी ५च्या सुमारास ओहोटी लागल्याने खाडीतील पाणी कमी झाले. त्यामुळे ही बोट गाळामध्ये रुतून बसली. या वेळी खलाशी व प्रवाशांनी अडकलेली बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले. अखेर त्यांनी सागरी पोलिसांना मदतीसाठी संपर्क साधला. या वेळी सागरी पोलिसांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यानंतर या अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला होवरक्राफ्ट पाठवण्यात आली. दरम्यान, सागरी पोलिसांनीही त्यांच्याकडील बोटीच्या साहाय्याने अडकलेली बोट खेचण्याचा प्रयत्न केला.
परंतु क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांच्या वजनाने ही बोट गाळामध्ये रुतलेली होती. अखेर सर्व प्रवाशांना होवरक्राफ्टमध्ये बसवून बेलापूर येथे सुखरूप सोडण्यात आल्याचे सहायक आयुक्त धनराज दायमा यांनी सांगितले. तिथून हे सर्व प्रवासी न्हावा गावाकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)