लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उन्हाने तापलेल्या मुंबईला पावसाचे वेध लागले असून, पावसाळ्यात मुंबईला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी वीज कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पावसाळ्याच्या तोंडावर उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, सर्व वितरण आणि ग्राहक उपकेंद्रांवर तपासणी आणि उपकरणांची प्रतिबंधात्मक देखभाल केली आहे.
दहा हजारांहून अधिक फिडर पिलर आणि जंक्शन बॉसवर अर्थ लिकेज चाचण्या करण्यात आल्या आहेत. झाडे पडून विद्युत उपकरणांचे नुकसान होऊ नये यासाठी वृक्ष छाटणीची मोहीम हाती घेण्यात आली. मुसळधार पावसात विद्युत उपकेंद्रात पाणी तुंबू नये, यासाठी डिवॉटरिंग पंप बसविण्यात आले असून, ट्रान्सफॉर्मर, फीडर पिलर आणि मीटर रूमची उंची वाढविण्यात आली आहे, अशी माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली.
आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडावी, यासाठी सबस्टेशनांवर आवश्यक उपकरणे, बचाव नौका आणि लाइफ जॅकेटस् ठेवले असून, शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आपत्कालीन वाहनांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. वीज खंडित झाल्यास, ती कमीत-कमी वेळेत पुनर्संचयित करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर, स्विचगियर, आणि उपकरणे यांचा पुरेसा साठा केला आहे. टोल फ्री १८००-२०९-५१६१.
पावसासाठी वीज कंपन्या सज्ज
हे करा
- मीटर केबिन गळतीपासून पुरेसे सुरक्षित असल्याची खात्री करा.- मीटरच्या केबिनमध्ये पाणी साचल्यास किंवा गळती दिसल्यास मुख्य स्विच बंद करावा.- वीज गडगडल्यास, घरात राहावे, खिडक्यांपासून दूर राहावे आणि शक्यतो मोबाइलचा वापर करू नये.
हे करू नका
- वीज गडगडताना, इमारतीच्या तारांना, प्लंबिंगच्या पाइपना हात लावू नका.- जोरदार वारा, वादळ आणि मुसळधार पाऊस पडल्यास झाडाखाली आसरा घेऊ नका- ओल्या हातांनी व सुरक्षा बूट आणि इन्सुलेटेड प्लॅटफॉर्म न वापरता कोणत्याही विद्युत उपकरणांना हात लावू नका- वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून चालण्याचा, पोहण्याचा किंवा गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका- पडलेल्या वीज तारांना स्पर्श करू नका, विजेच्या खांबांना स्पर्श करू नका.