आरक्षणाला धक्का लावल्यास सरकारला बेदखल करू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:24 AM2019-02-26T05:24:06+5:302019-02-26T05:24:13+5:30
ओबीसी भटके विमुक्त संघर्ष समितीने सोमवारी आझाद मैदानात काढलेल्या ओबीसी एल्गार मोर्चाच्या वेळी ते बोलत होते.
मुंबई : भटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावल्यास, मागासवर्गीय जनता या सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा ओबीसी नेते व आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. ओबीसी भटके विमुक्त संघर्ष समितीने सोमवारी आझाद मैदानात काढलेल्या ओबीसी एल्गार मोर्चाच्या वेळी ते बोलत होते.
राठोड म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षणाच्या कायद्यात दुरुस्ती करावी. मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकू शकत नाही. त्यामुळे ते घटनाबाह्य आरक्षण असून, त्यांना ओबीसीमध्ये सामील करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, ओबीसी समाज हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. युती सरकारला पाडण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी राज्यातील किमान सहा जागा ओबीसी उमेदवारांना देण्याचे आवाहनही राठोड यांनी केले. माजी आमदार प्रकाश (अण्णा) शेंडगे यांनीही मोर्चामध्ये सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी पीआरपीचे आमदार जोगेंद्र कवाडे, हरि नरके उपस्थित होते.
मोर्चामध्ये पारंपरिक वेशभूषेत सामील झालेल्या भटके विमुक्त, बंजारा समाजबांधवांनी सर्वांचेच लक्ष वेधले. प्रकाश शेंडगे यांनी राज्य मागासवर्गाची पूर्णत: पुनर्रचना करून, आयोगावर ओबीसी किंवा व्हीजेएनटी सदस्यांची नेमणूक करण्याची मागणी या वेळी केली.