Join us

चेंबूरमध्ये प्रवाशांचा रेल रोको, पिक अवरमध्ये लोकल अचानक रद्द केल्यानं संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 5:50 AM

चेंबूर-सीएसएमटी लोकल गुरुवारी सकाळी पिक अवरमध्ये अचानक रद्द करण्यात आल्यामुळे संताप अनावर झालेल्या प्रवाशांनी रेल रोको केला.

मुंबई : चेंबूर-सीएसएमटी लोकल गुरुवारी सकाळी पिक अवरमध्ये अचानक रद्द करण्यात आल्यामुळे संताप अनावर झालेल्या प्रवाशांनी रेल रोको केला.सामान्यत: सीएसएमटी येथून चेंबूरसाठी सकाळी ८.३३ वाजता लोकल रवाना होऊन ९.०७ वाजता चेंबूर स्थानकात पोहोचते. तर हीच लोकल चेंबूर येथून ९.११ वाजता सीएसएमटीच्या दिशेने रवाना होऊन सीएसएमटीला ९.४८ वाजता पोहोचते. चेंबूरहून सुटणारी ही लोकल गुरुवारी सकाळी रद्द करण्यात आली. परिणामी, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्या वेळी पनवेल येथून सुटलेली ८.४१ वाजताची ट्रेन ९ वाजून २२ मिनिटांनी चेंबूर स्थानकात पोहोचली. या लोकलसमोर येत प्रवाशांनी रेल रोको केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तो मागे घेण्यात आला. या गोंधळानंतर हार्बरची वाहतूक ९ वाजून ५६ मिनिटांनी सुरळीत झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला. २९ आॅगस्टच्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या ३८ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यातील एक सेवेत दाखल न झाल्यानेच लोकल रद्द करावी लागली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.>पावसाची विश्रांतीदोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावासाने गुरुवारी विश्रांती घेतली. परंतु शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.