Join us

भटक्या श्वानाचा बचाव केला म्हणून शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 2:42 AM

सोसायटीकडून कुटुंबाला त्रास; श्वानाला हाकलून लावण्यासाठी दबाव

- सागर नेवरेकर मुंबई : कांदिवली पूर्वेकडील अशोकनगर, सहकार ग्राम येथील साबरमती सोसायटीमध्ये पेठड कुटुंबीय राहतात. सोसायटीच्या आवारातीलभटक्या श्वानाला आणि तिच्या पाच पिल्लांचा बचाव केल्याने त्यांना महागात पडले आहे. सोसायटीच्या रहिवाशांकडून कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे. स्थानिक पोलीससुद्धा पेठड कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले नाहीत. सध्या पेठड कुटुंबीय भटक्या श्वानाची देखभाल करत आहेत़

रहिवाशी खुशबू पेठड म्हणाल्या की, सप्टेंबर महिन्यात सोसायटीतील एक वृद्ध व्यक्ती तोल जाऊन पडली होती. या अपघातात श्वानाला जबाबदार धरले गेले. यावेळी माझ्या भावाने वृद्धांना सांभाळले. पेठड कुटुंबीय श्वानाला अन्न देतातस, म्हणून सोसायटीतील रहिवाशांनी भावाला शिवीगाळ केली. आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारण्याची धमकीही दिली आहे. श्वानाला सोसायटीमधून हाकलून लावण्यासाठी रहिवाशांकडून सातत्याने पेठड कुटुंबीयांवर दबाव आणि मानसिक त्रास दिला जातआहे.

साबरमती सोसायटीचे अध्यक्ष विजय गोलटकर म्हणाले की, सोसायटीतील भटक्या श्वानाची तक्रार ही माझी एकट्याची नसून सोसायटीतील रहिवाशांची आहे. सोसायटीचे जेव्हा परिपत्रक काढले जाते, त्यात म्हटले जाते की, जे काही रहिवासी श्वान आणि मांजर असे प्राणी पाळतात, ते त्यांनी त्यांच्या घरी पाळावेत. लहान मुले, महिला, वयोवृद्ध सोसायटीच्या आवारामध्ये फिरत असतात. एखाद्या श्वानाने चावा घेतला, तर त्याला जबाबदार कोण? आम्हालाही पाळीव प्राण्याबाबत प्रेम, आपुलकी आहे. पेठड कुटुंबीयांना सोसायटीच्या रहिवाशांकडून त्रास दिला जात नाही.

अशा कुटुंबीयांना मदत केली पाहिजे

मी स्वत: प्राणिप्रेमी आहे. साबरमती सोसायटीमध्ये जो प्रकार घडला, तो फेसबुकवर पाहिला. यात पेठड कुटुंबीयांना सोसायटीच्या रहिवाशांकडून श्वानाची बाजू घेतल्याप्रकरणी छळले जात आहे. प्राणिप्रेमींनी पेठड कुटुंबीयांसारख्या नागरिकांना मदतीचा हात दिला पाहिजे. प्राणी कल्याण केंद्रानुसार पेठड कुटुंबीय बरोबर काम करत आहे. त्यामुळे आम्ही कायद्याप्रमाणे जाऊन लढण्याचे ठरविले. महापालिका आयुक्त, स्थानिक पोलीस, पेटा, प्राणिमित्र संस्था व संघटना यांना पत्र पाठवून पेठड कुटुंबीयांना मदत करा, अशी मागणी केली आहे.- केदार परब, माजी कॅप्टन, मर्चंट नेव्ही.

टॅग्स :कुत्रा