न्यायासाठी परिवहन कर्मचाऱ्यांचे साकडे
By admin | Published: December 26, 2015 01:05 AM2015-12-26T01:05:39+5:302015-12-26T01:05:39+5:30
कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्याप परिवहन सेवेत सामावून न घेणे, रखडलेली १२५ कोटींची देणी, यासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाबरोबर
ठाणे : कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्याप परिवहन सेवेत सामावून न घेणे, रखडलेली १२५ कोटींची देणी, यासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाबरोबर चर्चा करूनही त्यांना योग्य तो न्याय न मिळाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना साकडे घातले आहे. परिणामी, टीएमटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता राज्यपातळीवर जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी २६ जानेवारीला-प्रजासत्ताकदिनी बंदची हाक दिली आहे. कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेही त्यात सहभागी होणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी १५ आॅगस्टचा मुहूर्त साधून कामबंद आंदोलन केले होते. त्या वेळी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पण, कामगारांच्या मागण्यांसंदर्भात ठोस पावले उचलण्यात न आल्याने अखेर प्रजासत्ताकदिनी त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला.
यासंदर्भात १७ डिसेंबरला घेतलेल्या महापौरांच्या भेटीत त्यांनीही परिवहन सेवा सक्षम करण्याचे आश्वासन दिले. परिवहनच्या प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत आवाजही उठविला. आयुक्तांनीसुद्धा परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत परिवहन सक्षम करण्याचे आदेश दिले.