विद्यापीठात संशोधन वृत्ती वाढली पाहिजे
By admin | Published: July 6, 2017 06:57 AM2017-07-06T06:57:07+5:302017-07-06T06:57:07+5:30
प्रत्येक क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता आहे. आपल्याकडे संशोधनाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे विद्यापीठांमध्ये संशोधन वृत्ती वाढली पाहिजे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता आहे. आपल्याकडे संशोधनाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे विद्यापीठांमध्ये संशोधन वृत्ती वाढली पाहिजे. या दृष्टीने संशोधनावर अधिक निधीची तरतूद करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. काळानुरूप संशोधनाच्या पद्धतीतही बदल झाले पाहिजेत. समाजातील विविध क्षेत्रांतील विविध विषयांवर संशोधन झाले पाहिजे. पीएच.डी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक म्हणून निवृत्त प्राध्यापकांची नेमणूक करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञांनी विचार करावा, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
श्रीमती ना. दा. ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या १०१व्या स्थापना दिनानिमित्त विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट महाविद्यालय आणि प्रशासकीय कर्मचारी वर्गाला सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी, विनोद तावडे यांच्या हस्ते एसएनडीटीच्या ‘ई-सुविधा’ या मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. एसएनडीटी महाविद्यालयाच्या १०१व्या वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशनही तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी उपस्थित होत्या.
राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्या दृष्टीने विद्यापीठाने २५ विद्यार्थ्यांची निवड केल्यास, या विद्यार्थ्यांना १ वर्ष अथवा ६ महिन्यांसाठी राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये इंटर्नशिपचे शिक्षण मिळू शकेल, असेही तावेड यांनी या वेळी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या शतकोत्तर सोहळ्यानिमित्त सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या स्मरणार्थ भाऊबीज निधी उपक्रम ५ जुलै २०१७ ते ५ जुलै २०१८ दरम्यान करण्यात येणार आहे. यासाठी २५ हजार रुपयांची देणगी देण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. या निधीचा उपयोग हा उत्कृष्ट विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, तसेच पीएच.डी विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ म्हणून देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या भाऊबीज उपक्रमासाठी विनोद तावडे यांनी स्वत:च्या, तसेच पत्नी व मुलगी यांच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपयांचा निधी दिला.
गुणवत्ता वाढली पाहिजे
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना राज्य शासनातं १ वर्ष किंवा ६ महिन्यांकरिता आंतरवासिता उपक्रमासाठी २५ विद्यार्थ्यांची निवड करा, असे आवाहनही या कार्यक्रमात तावडेंनी केले. राज्यातील विद्यापीठाची वार्षिक गुणवत्ता वाढली पाहिजे, या अनुषंगाने नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये उल्लेख करण्यात आला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
आपण काळानुरूप बदलल्यावरच विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची येईल, असेही या वेळी प्राध्यापकांना सूचित केले.