संशोधन केंद्र कागदावरच, चार वर्षे उलटूनही कोनशिलेवरच बोळवण, वीटही रचली नाही
By सीमा महांगडे | Published: April 7, 2023 01:22 PM2023-04-07T13:22:23+5:302023-04-07T13:22:38+5:30
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात सुरू झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब ...
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात सुरू झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोशल जस्टिस’ या संशोधन केंद्राला चार वर्षे उलटूनही मूर्त स्वरूप प्राप्त झालेले नाही. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात या केंद्रासाठी तरतूद होऊनही अद्याप एक वीटही रचली गेली नाही. विद्यापीठाच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या केंद्रासाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाची अनास्था आणि वेळकाढूपणामुळे प्रत्यक्षात हे केंद्र कागदावरच राहिले आहे.
तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ६ डिसेंबर २०२० रोजी आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे भूमिपूजन केले होते. जगभरातील विद्यार्थी या केंद्रात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर संशोधन करतील, त्यासाठीची सर्व सुसज्जता आणि आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा असलेले हे केंद्र उभे राहणार असल्याची घोषणा केली होती. या केंद्राला अद्यापही पूर्णवेळ संचालक आणि कर्मचारी नियुक्त करण्यासाठी मान्यताही दिलेली नाही. त्यामुळे केंद्राचा कारभार छोट्याशा खोलीत सुरू आहे. केंद्रासाठी जाणीवपूर्वक अशी दिरंगाई विद्यापीठ प्रशासन आणि सरकारनेही केल्याचा आरोप केला जात आहे.
केंद्राची संकल्पना काय
या केंद्रात प्रामुख्याने देशा-परदेशातील तरुण, संशोधक, विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर संशोधन करतील, अशी संकल्पना आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार होत्या. अद्यावत ग्रंथालयांपासून इतर अनेक विभाग येथे विकसित केले जाणार होते. संशोधनासह प्रशिक्षण, विविध प्रकारचे अभ्यासक्रम येथे उपलब्ध केले जाणार होते.
कोणता अभ्यासक्रम?
राज्यातील तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रांशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे शिकविले जाणार आहेत. ‘आंबेडकरी विचार आणि तत्त्वज्ञान’ या विषयात एम. ए. व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाबरोबर ‘डेव्हलपमेंट स्टडीज् ॲण्ड सोशल पॉलिसी’ आणि ‘बुद्धिस्ट स्टडीज्’ या विषयांतही एम. ए. करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विविध ‘सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या’ आदी विषयांतही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून हे केंद्र उभे करण्यात येणार आहे. मात्र, ते कधीपासून याचे उत्तर विद्यापीठ प्रशासनाकडेही नाही.
दरवर्षी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात तरतूद होऊनही एवढ्या मोठ्या उपलब्ध करून दिलेल्या जागेत केवळ एक कोनशिला उभी करणे म्हणजे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकारच आहे. आतापर्यंत सेंटरकडून आयोजित केली गेलेली व्याख्याने, उपक्रम, चर्चासत्रं ही फक्त रिसर्च सेंटरच्या अजूनही न उभारण्यात आलेल्या इमारतीवरची मलमपट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ठेवा जपण्यासाठी आता जर सेंटरच्या इमारतीचे बांधकाम हाती घेतले गेले नाही तर छात्रभारतीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - रोहित ढाले, छात्रभारती संघटना