माध्यमांशी निगडित संशोधनाला प्रचंड वाव, त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता- दिनकर रायकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:50 AM2018-03-02T03:50:48+5:302018-03-02T03:50:48+5:30
समाज विज्ञानाची शाखा असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रात संशोधनाला प्रचंड वाव आहे. त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी गुरुवारी येथे केले.
मुंबई : समाज विज्ञानाची शाखा असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रात संशोधनाला प्रचंड वाव आहे. त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी गुरुवारी येथे केले.
‘प्रसार माध्यमांसंबंधित संशोधनपद्धती’ या विषयावर भारतीय समाज विज्ञान संशोधन संस्थेतर्फे (आयसीएसएसआर) मुंबई विद्यापीठात आयोजित सहा दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘बातम्या म्हणजे संशोधन कार्यच असते. मात्र माध्यमांवरच शास्त्रीय पद्धतीने दर्जेदार संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. सत्य हा संशोधनाचा आत्मा आहे. आयसीएसएसआर संस्थेच्या संचालक डॉ. डॉली सनी यांनी ही कार्यशाळा आयोजित करून संशोधकांना चांगले मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. ही एक नवी सुरुवात आहे,’ असेही रायकर पुढे म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन विभागाचे प्रा. सुंदर राजदीप यांनी कार्यशाळेचे संयोजन केले होते. या वेळी पत्रकार किरण तारे यांनी माध्यमातील त्यांचे अनुभव मांडले. अहमदाबाद विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थी विस्डम पीटर, वर्धा येथील हिंदी विश्वविद्यापीठातील संशोधक रुपाली अलोने, सोलापूर विद्यापीठातील मधुकर जक्कन यांनी या वेळी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या पश्चिम विभागातील ३० संशोधकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.