Join us

प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांवर संशोधन; 92 लाखांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 1:55 AM

प्रदूषण नियंत्रण मंडळाने तब्बल ९२ लाख रुपयांचा निधी जे.जे. रुग्णालयाला देणगी स्वरूपात दिला आहे. या माध्यमातून वायू आणि ध्वनिप्रदूषणामुळे होणाºया आजारांवर संशोधन करण्यात येणार आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याने विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. विविध शासकीय आणि अशासकीय संस्था पर्यावरणपूरक बदलांसाठी प्रयत्नशील आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे.जे. रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण सकारात्मक निर्णय घेतला आहे.

यात प्रदूषणामुळे होणाºया आजारांचे संशोधन व अभ्यास करण्यासाठी जे.जे. रुग्णालयसह सामंजस्य करार करण्यात आला आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने तब्बल ९२ लाख रुपयांचा निधी जे.जे. रुग्णालयाला देणगी स्वरूपात दिला आहे. या माध्यमातून वायू आणि ध्वनिप्रदूषणामुळे होणाºया आजारांवर संशोधन करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षांत अन्य प्रदूषणांसह सर्वाधिक वायू आणि ध्वनिप्रदूषणही वाढतेय. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन या समस्येशी निगडित रुग्ण वाढलेत का? त्यांना नेमका कशा स्वरूपाचा त्रास होतो? कारणे व परिणाम कोणते? या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आता जे.जे. रुग्णालयात करण्यात येणार आहे.

जागतिक स्तरावरही लहानग्यांमध्ये वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांत वाढ झाली असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने नोंदविले आहे. या संघटनेच्या माहितीनुसार, लहानग्यांना दूषित हवेमुळे श्वसनाचे विकारही जडतात ही गंभीर समस्या असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे.

याविषयी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, हा करार ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.या देणगीच्या माध्यमातून संशोधनासाठी उपयुक्त असणारे अद्ययावत तंत्रज्ञान घेणार आहोत. त्यानंतर लवकरच या विषयावर काम करण्यास सुरुवात करण्यात येईल.

टॅग्स :प्रदूषण