Join us

शिवडी रुग्णालयात एमडीआर जीवाणूंवर संशोधन होणार

By admin | Published: March 27, 2016 1:28 AM

मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात गेल्या काही वर्षांपासून क्षयरोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यातही मल्टि ड्रग्ज रेझिस्टंट (एमडीआर) रुग्णाची संख्या जास्त आहे. मुंबईत एमडीआर रुग्णांच्या

- पूजा दामले,  मुंबईमुंबईसारख्या गर्दीच्या शहरात गेल्या काही वर्षांपासून क्षयरोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यातही मल्टि ड्रग्ज रेझिस्टंट (एमडीआर) रुग्णाची संख्या जास्त आहे. मुंबईत एमडीआर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामागचे कारण शोधण्यासाठी एमडीआर क्षयरोगाच्या जीवाणूंचा अभ्यास शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात केला जाणार आहे. यासाठी रुग्णालयात ‘क्षयरोग प्रयोगशाळा’ उभारण्यात येणार आहे, असे क्षयरोग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले. क्षयरोग थुंकीतून, शिंक आणि खोकल्यातून हा आजार पसरतो. थुंकताना, खोकताना तोंडावर हात अथवा रुमाल ठेवल्यास आणि रस्त्यावर न थुंकल्यास क्षयरोगाचा संसर्ग रोखता येणे शक्य आहे. क्षयरोगाविषयी जनजागृती करूनही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोर क्षयरोग गंभीर होत चालला आहे. कारण, काही क्षयरोगाचे जीवाणू हे औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना औषधे देऊनही त्यांचा रोग बरा होऊ शकत नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. २०१२ सालापासून मुंबईतल्या एमडीआर रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१२मध्ये २ हजार १९५ रुग्ण आढळून आले होते. तर २०१५मध्ये एमडीआर रुग्णांची संख्या ३ हजार ६३२ इतकी झाली आहे. गेल्या ४ वर्षांत मुंबईतील क्षयरोग निदान क्षमता वाढल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, सामान्यत: एमडीआर रुग्णांमध्ये होणारी वाढ ही लक्षणीय आहे. यापूर्वी एमडीआर क्षयरोग रुग्णांकडून संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असल्याचा समज होता. मात्र, क्षयरोग रुग्णांप्रमाणेच एमडीआर रुग्णांमुळेही संसर्ग होतो. एका एमडीआर रुग्णामुळे वर्षाला १० जणांना एमडीआरची लागण होण्याचा धोका असतो. महत्त्वाचे म्हणजे क्षयरोग नसलेल्या व्यक्तीच्या शरीरात एमडीआरचे जीवाणू गेल्यास त्या व्यक्तीला थेट एमडीआरची लागण होते. या सर्व परिस्थितीचा विचार करता, एमडीआराचे संशोधन होणे आवश्यक आहे. शिवडी रुग्णालयात सुरू होणाऱ्या प्रयोगशाळेत एमडीआर जीवाणूंचा अभ्यास केला जाणार आहे. मुंबईत कोणत्या प्रकारचे जीवाणू जास्त प्रमाणात आहेत. त्यांचा परिणाम कसा होतो. औषधांना दाद न देण्याचे प्रमाण का वाढते आहे, याचे संशोधन केले जाणार असल्याचे डॉ. ननावरे यांनी सांगितले. क्षयरोग रुग्णांबरोबरच सामान्य मुंबईकरांनाही याचा फायदा नक्कीच होणार आहे. क्षयरोगाचा प्रादुर्भाव का वाढत आहे. या विषयावर संशोधन होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील एमडीआरच्या जीवाणूंचे प्रकार शोधण्यात येणार आहेत. जीवाणूंमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे, असेही डॉ. ननावरे यांनी नमूद केले. कोणते बदल होणार?- क्षयरोग रुग्णांचे मूत्रपिंड, यकृत, रक्ततपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा तयार करण्यात येणार- शस्त्रक्रिया विभाग अद्ययावत करण्यात येणार - पॅरामेडिकल आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत