मुंबई : भारतीय संस्कृतीच्या निर्माण आणि विकासात महिलांचा सहभाग आणि योगदान यावर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिलाविद्यापीठात (एसएनडीटी) संशोधन करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असलेल्या भारतीय ज्ञान व्यवस्था या घटकाशी हा प्रकल्प जोडला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना २ श्रेयांकचा (क्रेडीट) लाभ होणार आहे. ‘नारी ते नारायणी’ हा प्रकल्पाचा विषय असून, यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींना ३० तासांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
भारतीय संस्कृतीत महिलांच्या योगदानावर संशोधन करण्यात येणार आहे. विशेष प्रकल्पात प्रशिक्षित विद्यार्थिनीमार्फत पाच लाख नवीन विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.- प्रा. उज्ज्वला चक्रदेव, विद्यापीठाच्या कुलगुरू, एसएनडीटी
‘महिला ऋषींचा बौद्धिक वारसा’-
प्रकल्पाविषयी प्रा. चक्रदेव यांनी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या जगराणी व्याख्यानमालेत माहिती दिली. या प्रकल्पाद्वारे ३५ भारतीय महिला ऋषींच्या कार्याचा संच विद्यापीठामार्फत सातत्यपूर्ण संशोधनातून करण्यात येणार आहे. याचा उद्देश विद्यार्थिनींना प्रेरित करणे, महिला ऋषींच्या ज्ञानाचा परिचय करून देणे आणि देशाचा गौरवशाली इतिहास पुनरुज्जीवित करणे, हा असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित भारत @ २०४७ मिशनला विद्यापीठ चालना देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या व्याख्यानमालेला भारतीय ज्ञान, संस्कृत आणि योग केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्र तिवारी, विद्यार्थिनी प्रतिनिधी आस्था मेहता उपस्थित होते. ‘भारतीय महिला ऋषींचा बौद्धिक वारसा’ या व्याख्यानमालेस प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक जयंत कुलकर्णी, अधिष्ठान महेश भागवत उपस्थित होते.