मुंबई, इटलीतील संशोधकांना आढळली दुर्मिळ वनस्पती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 04:54 PM2020-10-28T16:54:24+5:302020-10-28T16:54:58+5:30
Found a rare plant : वनस्पती बऱ्याच किल्ल्यांवर आढळून आली.
मुंबई : मुंबई आणि इटलीतील संशोधकांनी सह्याद्रीतुन वनस्पतीची नवीन प्रजात शोधून काढली आहे. मुंबईतील साठ्ये महाविद्यालयातील सुशांत मोरे, इटलीतील कॅमेरिनो विद्यापीठातील फॅबीयो कॉन्टि व बीएनएचएस मुंबईतील हर्षल भोसले यांनी महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतून काटे चेंडूची नवीन प्रजात शोधून काढली. गेल्या वर्षी पावसाळ्यात ते पठारावरील दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींवर काम करत होते. तेव्हा ही वनस्पती त्यांना बऱ्याच किल्ल्यांवर आढळून आली.
जगात या वनस्पतीच्या १३० प्रजाती आढळून येतात. त्यापैकी ५ प्रजाती भारतात आढळून येत असून, त्यातील २ प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात. नव्याने आढळून आलेली प्रजात ही महाराष्ट्रातच आढळून येत असल्याचा दावा केला जात आहे. सहयाद्रीच्या पर्वत रांगांमध्ये ही प्रजात आढळल्याने त्यास सहयाद्री वरून नाव दिले गेले आहे. तिला सहयाद्री काटे चेंडू म्हणून संबोधले जाते. तिचा फुलोरा ९ सेंमी व्यासाचा आहे. आणि तो इतर प्रजातींपेक्षा जास्त मोठा आहे. पावसाळ्यात चार महिन्यात या वनस्पतीची वाढ होते. नोव्हेंबर महिन्यात ही वनपस्ती फुलून येते. डिसेंबर महिन्यात फळे धरतात. मधमाश्या आणि इतर कीटक या वनस्पतीकडे लगेच आकर्षित होतात. तिच्या फुलाच्या गोडसर सुगंधामुळ असते.