Join us

गटारात वाहून गेलेल्या दिव्यांशचा महापालिकेकडून पुन्हा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:41 AM

गोरेगावमधील आंबेडकर चौक येथील गटारात पडून वाहून गेलेल्या दीड वर्षीय दिव्यांशचे शोधकार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : गोरेगावमधील आंबेडकर चौक येथील गटारात पडून वाहून गेलेल्या दीड वर्षीय दिव्यांशचे शोधकार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. स्थानिकांनी सुचविलेल्या चार वेगवेगळ्या ठिकाणी शनिवारी सकाळपासून मुंबई महापालिकेने हे शोधकार्य सुरू केले आहे. ४ टीमचे ४० कामगार दिव्यांशचा शोध घेत आहेत.बुधवारच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफने दिव्यांशचा शोध घेतला. मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्याचा काहीच शोध लागला नाही. अखेर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास म्हणजे ४८ तासांनी हे शोधकार्य थांबविण्यात आले होते. स्थानिकांनी संताप व्यक्त करत, महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढत दिव्यांशचा शोध घेण्याची मागणी केली. त्यानंतर, महापालिकेने शनिवारी सकाळपासून दिव्यांशचे शोधकार्य पुन्हा हाती घेतले. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे रॉमेल, अ‍ॅनमॉल टॉवर, पिरामलनगर आणि परवशी येथे गाळ अधिक आहे. त्या ठिकाणी दिव्यांशचा पुन्हा शोध घेण्यात येत आहे.>गटारावरचे झाकण काढले कोणी?दिव्यांश ज्या गटारात पडला; त्या आंबेडकर चौकातील गटारावरचे झाकण नक्की कोणी काढले, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. दिव्यांश ज्या ठिकाणी पडला तेथील गटारावर आधी झाकण असल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. मात्र तो पडला त्या वेळी तेथे पावसाचे पाणी साचले होते. ते पाणी वाहून जाण्यासाठी हे झाकण काढण्यात आले.