दीपक मोहिते, वसईवसई-विरार परिसरात सध्या पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आहे. महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांनी पाण्याच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वास्तविक धरणातील पाण्याची पातळी खोलवर जाणे, प्रचंड उष्म्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन आणि वीजेचा लपंडाव अशा कारणामुळे सध्या पाण्याचा प्रश्न जटील होत आहे. परंतु या प्रश्नाचे राजकारण करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे.दरवर्षी उन्हाळ्यात लोकसंख्येच्या तुलनेत येथे पाणी पुरवठा कमी होतोे. सध्या उसगाव धरणातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध केल्यामुळे पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तानसा नदीचे पाणी शिरवली बंधाऱ्यात घेऊन ते देण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे पेल्हार धरणातील पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने नालासोपारा व अन्य परिसरात पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली आहे. सुर्या प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असतानाही महावितरणच्या गोंधळामुळे तसेच वीजेच्या लपंडावामुळे पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चे, धरणे आंदोलने सुरू केले आहेत. यंदा महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यामुळे विरोधी पक्षाने याप्रश्नी उचल खाल्ली आहे. क्रमश:
पाण्याच्या प्रश्नावरून विरोधकांचे शरसंधान
By admin | Published: April 22, 2015 10:52 PM