Join us

कोकणसाठी आरक्षण बंद; मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करू द्यावा; प्रवासी सेवा संघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 5:33 AM

अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्यात; गर्दीची पुनरावृत्ती नको

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कोकणवासीयांसाठी सोडण्यात आलेल्या सर्व मेल/एक्स्प्रेस केव्हाच फुल झाल्या असून, या सर्व गाड्यांचे आरक्षण बंद झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. 

 ज्या प्रवाशांचे तिकीट वेटिंग आहे अशा प्रवाशांनाही मेल/एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, याकडे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी लक्ष वेधले आहे.  १५ ते १९ ऑगस्टपर्यंत मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्यांची मोठी प्रतीक्षा यादी लागली आहे. २ सप्टेंबर रोजी ०९००९ क्रमाकांची मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड स्पेशल गाडी सुटेल. ही ट्रेन झाराप स्थानकावर १:३० वाजता पोहोचेल आणि १:३२ वाजता तेथून निघेल. ३ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथून निघणारी ०९०१० ही ट्रेन झाराप स्थानकावर ५ वाजता पोहोचेल. ५:०२ वा.स्थानकाहून निघेल. 

१४ ऑगस्टच्या रात्रीपासूनच्या गाड्यांना लागलेला रिग्रेट संदेश हा गर्दीचा निर्देशक आहे. २६ जानेवारीला लागून आलेल्या सुट्टीवेळी प्रवाशांनी एसी डब्यांतही गर्दी केली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई-सावंतवाडीदरम्यान स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधनानिमित्त गाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :कोकण रेल्वेमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे