पोलिसांच्या सहकार्याने फेरीवाल्यांचे आरक्षण
By admin | Published: July 3, 2015 02:09 AM2015-07-03T02:09:24+5:302015-07-03T02:09:24+5:30
निवासी भागात निश्चित केलेल्या फेरीवाला क्षेत्राला स्थानिक रहिवाशांकडून विरोध झाल्यामुळे पालिकेने आता वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार फेरीवाल्यांचे
मुंबई : निवासी भागात निश्चित केलेल्या फेरीवाला क्षेत्राला स्थानिक रहिवाशांकडून विरोध झाल्यामुळे पालिकेने आता वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार फेरीवाल्यांचे आरक्षण निश्चित करून प्रभागस्तरावर जनसुनावणी होणार आहे़ त्यानंतरच फेरीवाला क्षेत्राची अंतिम यादी जाहीर होणार आहे़
राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार मुंबईतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे़ मात्र गेली अनेक वर्षे हे धोरण विविध कारणांमुळे रखडले आहे़ यावर तोडगा काढण्यासाठी शहर नियोजन समिती स्थापन करण्यात आली असून फेरीवाल्यांकडून सव्वाशे अर्जही जमा करण्यात आले आहेत़ त्यानुसार नुकतेच फेरीवाला क्षेत्रांची यादी जाहीर करण्यात आली होती़ परंतु काही निवासी क्षेत्रातून या आरक्षणाला कडाडून विरोध झाला़
गजबजलेल्या तसेच वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरणाऱ्या रस्त्यांची माहिती वाहतूक पोलिसांना अधिक असते़ त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने फेरीवाला क्षेत्राचे आरक्षण निश्चित करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे़ ही यादी तयार झाल्यानंतर प्रभागनिहाय जनसुनावणी होऊन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)
यासाठी वाहतूक पोलिसांची मदत
कोणत्या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ किती? फेरीवाला आरक्षण ठेवणे कोणत्या मार्गावर सोयीस्कर ठरेल व कोणत्या रस्त्यावर अडचणीचे याचा अंदाज वाहतूक पोलिसांकडून घेणे शक्य होईल़ त्यानुसार अशा रस्त्यांची यादी आल्यानंतर फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे सोपे जाईल, असा विश्वास पालिकेला वाटत आहे़
जनसुनावणीनंतरच अंतिम यादी
पालिकेने निश्चित केलेल्या फेरीवाला क्षेत्राला नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने जनसुनावणीनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे़ नागरिकांनी एखाद्या फेरीवाला क्षेत्रावर आक्षेप घेतल्यास त्याबाबत शहानिशा करून अंतिम निर्णय घेतला जाईल़ त्यामुळे स्थानिक नागरिकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केले़