Join us

"आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का"?; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 12:54 PM

आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंना प्रश्न केला आहे.

मुंबई - मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्यापही मिटलेला नसून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने सगसोयरे शब्दाच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसींच्या योजनांचा लाभ मराठा समाज बांधवांना देण्याची अधिसूचना काढल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगत नवी मुंबईत मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाल उधळला. मात्र, त्यानंतरही त्यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याच्या इशारा दिला आहे. त्यावरुन, आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंना प्रश्न केला आहे.

तुम्ही गुलाल उधळला, मराठा आरक्षण मिळालं. मग, आता पुन्हा उपोषणाची भाषा कशासाठी करताय, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला होता. त्यावर, जरांगे यांनीही एकेरी भाषेत छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. ते मंत्री राहिलेत, त्यांना एवढही कळत नाही का आम्ही गुलाल कशाचा उधळलाय. गेली ७५ वर्षे कायदा बनत नव्हता, आता २००१ च्या कायद्यात मराठे ताकदीने घुसलेत. आम्हाला चॅलेंज करतो, अध्यादेश रद्द होऊ दे मग मंडल आयोगच रद्द करतो, असे म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर पलटवार केला आहे. तसेच, मराठा समाजाने न्हाव्यांकडे दाढी आणि कटींगला जाऊ नये, असेही भुजबळ यांनी म्हटले होते. त्यावरही जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ''आता त्यांचं वाटोळं करायला निघालाय, त्यांना अन्नापाण्याला नाही का जाऊन द्यायचं. मराठे त्यांच्याकडं नाही गेल्यावर त्यांनी काय खायचं, असा सवालही त्यांनी विचारला. हा खालच्या विचारांचा माणूस असून ओबीसीला कलंक आहे. बारा बलुतेदारांना खाऊ देत नाही. हा राजकारण माणूस आहे, ओबीसींनाही ते लक्षात आलंय. त्यामुळेच, आजच्या सभेला किती गर्दी होती?, असा प्रश्न विचारत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला. 

मी १६ नोव्हेंबरला राजीनामा दिलाय

मी अशी भाषणे करतो, सरकारमधले, विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हाकला असं म्हणाला. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारला सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला जालनातील अंबडला रॅली झाली. १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला. 

जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. राज्य सरकारने येत्या १५ दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. ९ तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे. जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :मराठा आरक्षणछगन भुजबळआरक्षणमनोज जरांगे-पाटील