महिला चालक असलेल्या वाहनांसाठी सार्वजनिक पार्किंगमध्ये आरक्षण; मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:17 PM2022-12-21T23:17:46+5:302022-12-21T23:19:32+5:30
लोढा म्हणाले की, राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नागपूर: राज्यातील सार्वजनिक वाहन पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर उत्तर देताना मंगलप्रभात लोढा बोलत होते.
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी महिला आता वाहने चालविताना दिसत आहेत. कॅबचालक म्हणूनही महिला काम करत आहेत. सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्यांची होणारी कुचंबना, गैरसोय पाहता आता अशा सार्वजनिक पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
राज्यात वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर महिला चालकांची संख्या देखील उल्लेखनीयरित्या वाढत आहे! त्या अनुषंगाने सार्वजनिक पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांना 20% जागा राखीव ठेवण्यात येतील!
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) December 21, 2022
याबाबत विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर उत्तर देताना घोषणा केली!