कोल्हापूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, कोर्टाने ते आरक्षण रद्द केले. आता, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यासाठी विरोधकांशी मी बोलेन आणि माझ्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा राहिल, असे शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटले. तसेच 15 वर्षात आम्ही काय केलं यावर बोलताना, 15 वर्षात आम्ही आरक्षण दिले, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेकॉर्डिंगच्या मुद्द्यावरुन शाब्दिक वार केले. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारे वक्तव्य हे आगीत तेल ओतणारे आहे. असे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी रेकॉर्डिंग सादर करावे, असेही पवार म्हणाले. मराठा आरक्षणावर भाष्य करताना पवार यांनी फडणवीस सरकारलाही लक्ष्य केले. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. पण कोर्टात तो निर्णय रद्द झाला, तोपर्यंत आचारसंहिता लागली. त्यानंतर, भाजपचे सरकार आले. या सरकारनेही धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे अभिवचन दिले होते. ते आपले वचन पूर्ण करतील असे वाटत होते. पण तरुणांना काहीही न मिळाल्यामुळेच हे आंदोलन पेटल्याचे शरद पवार यांनी म्हटले. तसेच कायद्यात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी घटनेत किरकोळ बदल करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा. याबाबत मी विरोधकाशी बोलेन, त्याला आमच्या पक्षाचाही पाठिंबा असेल, असेही पवार यांनी म्हटले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरात पाटील यांना लक्ष्य करण्यासही ते विसरले नाहीत. शरद पवार यांनी 14 वेळा निवडणूक लढवली, पण चंद्रकांत पाटील यांनी जनतेतून निवडून यावे. त्यानंतर, निवडणूक आली की पवारांना जात आठवते, असे वक्तव्य करावे, असा टोलाही पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. तर सरकार जनतेपासून राफेल प्रकरणात काहीतरी महत्वाचं लपवतय, असा आरोपही त्यांनी केला.