मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतूक होत असताना शिवसेनेनं आपल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं ट्टविट केलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंनी सराकारकडे सातत्याने मागण्या केल्या होत्या. त्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे शिवेसनेनं म्हटलं आहे.
मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपा आमदार जल्लोष करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे यश आल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेनं ट्विटर करुन याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच राजकीय पक्ष आझाद मैदानात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलकांनी भेट घेतली. तत्पूर्वी अजित पवार यांनी मराठा आंदोलकांनी भेट घेतली. त्यावेळी बोलताना, ही श्रेय घेण्याची वेळ नाही. आपण आपली जबाबदारी पार पाडली आहे. परुंतु, काही राजकारणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे चुकीचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच मराठा आरक्षणासाठी 40 जणांनी आपला जीव दिला, त्यांचं बलिदान लक्षात ठेवायचं असतं. त्यामुळे आज मी फेटा बांधला नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
'कुणीही श्रेय घेऊ नये, 40 आंदोलकांचं बलिदान लक्षात ठेवावं, जल्लोष करायचा नसतो'
दरम्यान, बहुचर्चित मराठाआरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठाआरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे.