Join us  

सात भूखंडांवरील आरक्षण रद्द

By admin | Published: April 08, 2015 3:35 AM

वेसावे कोळीवाड्यात नव्या विकास आराखड्यात अनेक मोठ्या रस्त्यांचे आरक्षण ठेवण्यात आल्यामुळे येथील सुमारे २० हजार कोळी बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे

मनोहर कुंभेजकर, वेसावेवेसावे कोळीवाड्यात नव्या विकास आराखड्यात अनेक मोठ्या रस्त्यांचे आरक्षण ठेवण्यात आल्यामुळे येथील सुमारे २० हजार कोळी बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यातच पालिकेच्या २०१४ ते २०३४ च्या प्रस्तावित विकास आराखड्यात येथील अग्रगण्य असलेल्या वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटीच्या सात भूखंडांवरील आरक्षण रद्द करण्यात आल्यामुळे या नव्या विकास आराखड्याविरोधात वेसावकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या नव्या विकास आराखड्याविरोधात वेसावकर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार आहेत. सर्वसमावेशक नसलेला आणि वेसावकरांना उद्ध्वस्त करणारा हा नवा विकास आराखडा आता अरबी समुद्रात बुडवा, अशी प्रतिक्रिया वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सोसायटीच्या मालकीच्या असलेल्या ५१४, १००३, १००४, १००५, १००६, १००७ आणि १००८ या सात भूखंडांवरील आरक्षण या नवीन आराखड्यात उठवण्यात आले आहे. पब्लिक ओपन स्पेस, मल्टिपर्पज वेल्फेअर कम्युनिटी सेंटर, रस्ता, शीतगृह, महापालिका मार्केट, फिशिंग गोडाऊन या विविध उपभोगासाठी हे भूखंड आता राखीव ठेवण्यात आले आहेत. जुन्या आराखड्याप्रमाणे पूर्वी हे भूखंड औद्योगिक, कोळी हाऊसिंग तसेच मच्छीमारांसाठी आणि कोळी बांधवांच्या व्यवसायासाठी राखीव होते. या भूभागावर संस्थेने महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने बर्फ कारखाना उभारल्याची माहिती देण्यात आली.