रेल्वेचे तत्काळ आरक्षण अवघ्या तीन सेकंदात, आयआरसीटीसीचा ईपेलेटरसोबत करार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 05:52 PM2017-08-10T17:52:10+5:302017-08-10T17:52:41+5:30
ई-लेटरमार्फत केवळ तीन सेकंदांत तिकिटाचे आरक्षण होते. यामुळे ही सुविधा तत्काळ आरक्षण करणा-यांसाठी वरदानासारखी ठरणार आहे.
मुंबई, दि. 10 - डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची पायरी म्हणून आयआरसीटीसी या भारताच्या सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स मंचाने ईपेलेटरशी भागीदारी करून 'आत्ता आरक्षण करा, पैसे नंतर द्या' (बुक नाऊ पे लेटर) ही सुविधा देत तिकीट आरक्षण प्रक्रिया अधिक सोयीस्कर केली आहे. या भागीदारीवर बुधवारी संसदेच्या सत्रातही रेल्वेमंत्री श्री. राजेन गोहेन यांनी चर्चा केली.
ई-लेटरमार्फत केवळ तीन सेकंदांत तिकिटाचे आरक्षण होते. यामुळे ही सुविधा तत्काळ आरक्षण करणा-यांसाठी वरदानासारखी ठरणार आहे. इंटरनेटचा संथ वेग किंवा ऑनलाइन पेमेंटच्या पारंपरिक पर्यायांतील लांबलचक प्रक्रियेमुळे ऑनलाइन आरक्षणात अडचणी येत होत्या.
मुंबईस्थित अर्थशास्त्र फिनटेक या कंपनीच्या ईपेलेटर या गेटवेमार्फत प्रवाशांना केवळ एक क्लिक आणि ओटीपी भरून तिकीट आरक्षित करता येते. क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग आदी पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत ईपेलेटरने आऱक्षण करणे खूपच सोपे आणि वेगवान आहे. या आरक्षण प्रक्रियेत एकदाच साइन-अप करून ठेवावे लागते. यात ग्राहकाला पॅन क्रमांक व आधार क्रमांकासोबत काही तपशील द्यावे लागतात. या तपशिलांची नियतरीत (अल्गोरिदम) वापरून ईपेलेटर त्या-त्या वेळी ग्राहकासाठी पैसे भरण्याची एक मर्यादा निश्चित करून देते आणि ही मर्यादा वापरून आरक्षण करता येते.
संकेतस्थळावर पैसे भरण्याच्या पर्यायांमध्ये या सेवेचा समावेश करण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी संसदेत सांगितले. त्याचबरोबर ही सेवा वापरण्यासाठीच्या अटी व नियमही तिथे नमूद करण्यात आले आहेत. तिकीट आरक्षित झाल्यानंतर पुढील 14 दिवसांत कधीही ग्राहक त्यांच्या सोयीने ऑनलाइन पद्धती वापरून पैसे भरू शकतात. यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे कॅशलेस व डिजिटल झाली आहे.
रेल्वेमंत्रालयाने ट्विटरवर @RailMinIndia "बाय रेल तिकिट्स नाऊ एण्ड पे लेटर' या अधिकृत हॅण्डलमार्फत याबाबत ट्विट पोस्ट केले आहे. ईपेलेटरमार्फत केवळ तीन सेकंदांत तिकिटाचे आरक्षण होते असे काही ऑनलाइन वापरकर्त्यांनीच सांगितले आहे. यामुळे ही सुविधा तत्काळ आरक्षण करणा-यांसाठी वरदानासारखी ठरणार आहे. इंटरनेटचा संथ वेग किंवा ऑनलाइन पेमेंटच्या पारंपरिक पर्यायांतील लांबलचक प्रक्रियेमुळे ऑनलाइन आरक्षणात अडचणी येत होत्या.
ईपेलेटरसारख्या अत्याधुनिक पद्धती वेगवान व सोयीस्कर तर आहेतच, शिवाय देशातील पत समावेशनाच्या उद्दिष्टाकडे या पद्धती घेऊन जात आहेत. डेटा सायन्सचा जास्तीत जास्त उपयोग करून व्यक्तीची पैसे देऊ शकण्याची क्षमता डोळ्याची पापणी लवण्यापूर्वी ठरवली जाते. अशा पद्धतीने ईपेलेटर हा एक डेटावर आधारित कर्ज देणारा मंच ठरू शकतो.