Join us  

मुंबईतील शाळा कॉलेजांमध्ये भूमिपूत्रांसाठी सीट राखून ठेवा; वेसावा कोळी जमातीची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: May 02, 2023 12:40 PM

वेसावा गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

मुंबई- मुंबईतील भूमिपुत्र कोळी समाजाने मुंबईच्या विकासामध्ये सर्वस्व अर्पण केले. मात्र या समाजातील पाल्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे भूमिपुत्र या नात्याने या मुंबईमध्ये उभी राहिलेली सर्व शैक्षणिक सुविधांमध्ये जागा राखून ठेवाव्यात असा ठराव महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. 

वेसावा गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी हा ठराव करण्यात आला. वेसावे गावातील प्राधान्याने उत्तीर्ण झालेल्या आणि पदवी परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच वेसावा कोळी जमत ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच  संपन्न झाला. वेसावा कोळी समाज शिक्षण संस्थेचे सुभाष सिध्दे या वातानुकूलित सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वेसाव्यातील 54 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. इयत्ता दहावी - बारावी मध्ये प्रथम आलेल्या तिघांना गौरविण्याबरोबर, निरनिराळ्या शाखेतील पदवी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या अशा सर्व युवकांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल असोसिएशन ऑफि फिशरमेनचे अध्यक्ष डॉ गजेंद्र भानजी, वेसावा मच्छीमार विकास सोसायटीचे अध्यक्ष जयेंद्र लडगे, मरोळ बाजार कोळी महिलांच्या नेत्या राजश्री भानजी, वेसावा कोळी  महिला सामाजिक संस्थेचे अध्यक्षा शारदा पाटील, वेसावा कोळी जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रवीण भावे, वेसावा कोळी समाज शिक्षण संस्थेच्या खजिनदार पुष्पाताई कालथे, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विकास कोळी, कोळी संगीत दिग्दर्शक विजय कठीण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वेसावे  ग्रामदैवत असलेल्या श्री हिंगळादेवी मातेच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वेसावा कोळी जमातीचे अध्यक्ष राजहंस टपके यांच्यासोबत विश्वस्त सचिन चिंचय, राजहंस लाकडे, दक्षित टिपे, गणेश गणेकर, राखी धाकले, नंदू दामोदर भावे, स्वप्निल भानजी संदीप रागाभगत, प्रभा हिरे, किरण हिरे, रोहन आडी, पराग शिपे, विशाल मांडवीकर आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांची भाषणे होऊन विद्यार्थी आणि पालक यांनी देखील आपल्या यशस्वीतेचे आणि समस्यांबाबत भाष्य केले. वेसावा गावातील कोळी समाजाच्या अस्तित्वाबाबत आणि वेसावेत होणारी परकीयांची गर्दी याबाबत चर्चा झाली, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजहंस टपके यांनी समाजाला उद्देशून समाजाच्या व्यथा आणि उपाय यावर प्रकाशझोत टाकला. विद्यार्थ्यांना स्मृतीची सन्मान चिन्ह बरोबर रोख पारितोषिकाचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले या भरगच्च आणि उत्साहवर्धक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेसावा कोळी जमातीच्या विश्वस्ता राखी धाकले यांनी सुंदर पद्धतीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टच्या मॅनेजर रूपा डोंगरीकर, कैलास पाटील आणि राखी नागा यांनी मेहनत घेतली.

टॅग्स :मुंबई