मुंबई-
महिला व ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच तृतीयपंथीय (किन्नरांना ) देखील बीएसटी एसटी व लोकल- रेल्वेमध्ये आसन व्यवस्था आरक्षित असावी अशी मागणी मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्रालयला केली आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळामध्ये तृतीयपंथी यांच्या अडचणी व प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. महिला व ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे बेस्ट,एसटी व लोकल -रेल्वेमध्ये तृतीयपंथी किनारांसाठी देखील आसन व्यवस्था आरक्षित असावी आणि सामाजिक न्याय समतेला धरून ही मागणी असल्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी लोकमतला सांगितले.
तृतीयपंथी सुद्धा समाजाचा एक महत्वाचा भाग आहेत, त्यांना काही मूलभूत अधिकार आहेत. हे समाज म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आपण संवेदनशीलतेने जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे तृतीय पंथियांना बेस्ट, एसटी, रेल्वेत आसन आरक्षित करण्याची मागणी आज या समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. दुर्लक्षित समाजाला प्रवाहात सामील करून घेण्यासाठी शिंदे साहेब यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. येणाऱ्या काळात त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल हा विश्वास आमदार सुर्वे यांनी व्यक्त केला
याबाबत मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांना आमदार प्रकाश सुर्वे यांचे निवेदन दिले व यावर परिवहन सचिवांना याबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांना दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. या हिवाळी अधिवेशनापूर्वी अँड पूनम यादव तसेच दोनशे किनारांनी आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत लेखी मागणी केली होती आणि आपण याचा तसाच पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.