Join us

विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये घुसखोरी; राजकीय कायकर्ते, अधिकाऱ्यांचा निवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 7:40 AM

ग्रामीण भागातील विद्यार्थी वाऱ्यावर

- दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून शासनाने बांधलेल्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांऐवजी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मंत्रालयातील अधिकारी राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

चर्चगेट रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या मातोश्री हॉस्टेलमधील खोल्यांवर राजकीय आशीर्वादाने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मंत्रालातील अधिकारी, शिक्षण पूर्ण झालेले काही विद्यार्थ्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणे अवघड झाले आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी तीन आठवड्यांपूर्वी या हॉस्टेलला अचानक भेट दिली होती. ही घुसखोरी लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने या घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, अजूनही कारवाई झालेली नाही. 

घुसखोरी केलेले राजकीय कार्यकर्ते आणि अधिकारी शासनाला एक पैसा न देता फुकट येथे राहत असल्याचेही समोर आले आहे. येथील वॉर्डनवर दादागिरी करणे, कॅन्टीनचे पैसे न देणे, असे प्रकारही येथे केले जात आहेत., 

आरक्षणही पायदळी तुडवलेचर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये ३६० विद्यार्थी क्षमता आहे. यातील ३४५ जागा या नऊ शासकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी कोट्यानुसार राखीव आहेत. या जागा आरक्षणानुसार भरल्या जातात, तर ५ जागा स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांसाठी आणि १० जागा शासनाच्या शिफारशीसाठी राखीव आहेत. मात्र, सध्या हे आरक्षणही पायदळी तुडवण्यात आले आहे.