लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : त्वचा विभागातील रुग्णांचे मृत्यू, निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी, सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि विभागप्रमुखांकडून सातत्याने होणारा त्रास अशा विविध कारणांमुळे जे.जे. रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी १८ डिसेंबरपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्डने अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांना त्वचारोग विभागप्रमुख डॉ.महेंद्र कुरा यांच्यावर कारवाई करण्याबाबत दाेन वेळा पत्र दिले होते. निवासी डॉक्टरांच्या या निर्णयाला त्वचारोग विभागातील पाच प्राध्यापकांनीही पाठिंबा दिला आहे. यात डॉ. रत्नाकर कामत, डॉ. मनजीत रामटेके, डॉ. उषा खेमानी, डॉ. राजेश कुमार आणि डॉ. अविनाश साजगणे यांचा समावेश आहे.
जे. जे. रुग्णालय अधिष्ठात्यांनी समितीची स्थापना करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे म्हटले होते, परंतु समिती स्थापन होऊन तपासात प्रगती नसल्याची माहिती त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांनी सांगितले.
अहवाल येईपर्यंत थांबा, जे.जे.ची सूचनाजे जे रुग्णालयाच्या मार्ड संघटनेने प्रशासनाला विभाग प्रमुखाविषयी पत्र दिले आहे. परंतु या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ अजय चंदनवाले यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमण्यात आली असून चौकशी सुरु आहे. या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेचा निर्णय घेऊ नये अशी विनंती जे जे रुग्णालय प्रशासनाने केली आहे.
तर राज्यव्यापी संपमागणीची पूर्तता न झाल्यास, विभागप्रमुखांवर कुठलीही कारवाई न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, अशी माहिती मार्ड संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी दिली आहे.