मुंबई - त्वचा विभागातील रुग्णांचे मृत्यू, निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी, सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि विभागप्रमुखांकडून सातत्याने होणारा त्रास अशा विविध कारणांमुळे जे.जे. रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जे.जे.रुग्णालय प्रशासनासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून विभागप्रमुखांवरील कार्यवाहीबाबत सातत्याने होणारे दुर्लक्ष पाहता मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने १८ डिसेंबरपासून सामूहिक रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स ( मार्ड ) संघटनेने ९ डिसेंबर रोजी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना त्वचारोग विभाग प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्यावर कारवाई करण्याबाबत पत्र दिले होते. मात्र या पत्रावर योग्य कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा जे.जे. रुग्णालय प्रशासनाला १५ डिसेंबर रोजी याबाबत स्मरणपत्र देण्यात आले, या पत्रात विभागप्रमुखांवर कारवाई न झाल्यास सामूहिक रजेचा इशारा देण्यात आला होता. निवासी डॉक्टरांच्या या निर्णयाला त्वचारोग विभागातील अन्य पाच प्राध्यापकांनीही पाठिंबा दिला आहे. यात डॉ.रत्नाकर कामथ, डॉ. मनजित रामटेके, डॉ. उषा खेमानी, डॉ. राजेश कुमार आणि डॉ. अविनाश साजगणे यांचा समावेश आहे.
जे.जे. रुग्णालय अधिष्ठात्यांनी संबंधित विभागप्रमुखांवर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. तसेच, त्यासाठी समितीची स्थापना करुन त्यांतर्गत प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे म्हटले. होते. परंतु, समिती स्थापन होऊन तपासात प्रगती नसल्याची माहिती त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारे यांना याबाबत लेखी पत्र दिले. या प्रकरणाविषयी डॉ. वाघमारे यांनी जे.जे.रुग्णालयात निवासी डॉक्टरांची भेट घेऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच, चौकशीसाठी राज्य स्तरीय समितीची स्थापना करण्याबाबत सांगितले, मात्र १५ डिसेंबरपर्यंत कोणत्याही समितीची स्थापना न झाल्याने निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
...तर राज्यव्यापी संपयाप्रकरणी संबंधित यंत्रणांकडून आश्वासन देऊन देखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याने १८ डिसेंबरपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही मागणीची पूर्तता न झाल्यास , विभाग प्रमुखांवर कुठलीही कारवाई न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल अशी माहिती मार्ड संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी दिली आहे.