Join us

निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच; दुसऱ्या दिवशीही कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:00 AM

शनिवारी सकाळी रुग्णाच्या नातेवाइकांनी दोन निवासी डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

मुंबई : सर जे.जे. रुग्णालयात रविवारीही निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. रुग्णालयात शनिवारी सकाळी रुग्णाच्या नातेवाइकांनी दोन निवासी डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. असे असूनही प्रशासन मात्र याविषयी ‘ढिम्म’च असल्याचे पाहून निवासी डॉक्टरांनी हे काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.शनिवार सकाळच्या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शनिगारे, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नंणदकर यांच्यासमवेत बैठक झाली. तर रविवारी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांच्यासह जे.जे रुग्णालयात बैठक झाली; परंतु या बैठकींच्या सत्रानंतरही या निवासी डॉक्टरांच्या पदरी निराशाच आल्याने कामबंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. जे.जे, सेंट जॉर्ज, कामा व जीटी रुग्णालयातील ४५०हून अधिक निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.रविवारी सकाळपासूनचजे.जे. रुग्णालयाच्या आवारात अधिष्ठाता केबिनसमोर यानिवासी डॉक्टरांनी ठिय्या मांडून या घटनेचा निषेध नोंदविला. शिवाय, सुरक्षेच्या मुद्द्याला आता तरी गांभीर्याने घेण्याची मागणी केली. मारहाणीत जखमी झालेल्या डॉ. आतिश पारीख आणि डॉ. शाल्मली धर्माधिकारी या दोघांवरही उपचार सुरू आहेत. या घटनेने ती कोसळली डॉ. शाल्मली धर्माधिकारी हिला जे.जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून सेवेत येऊन केवळ १३ दिवसच झाले आहेत. त्यामुळे या घटनेने तिला मानसिक धक्का बसला आहे. वैद्यकीय शिक्षण घेताना जे.जे. सारख्या संस्थेत आपण योगदान द्यावे, असे प्रत्येक वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्याचे स्वप्न असते, हेच स्वप्न उरी बाळगून शाल्मलीनेही पुण्याहून मुंबापुरी गाठली. रुग्णालयातील विभागांत वावर न करता, रुग्णसेवेवरील परिणाम टाळण्यासाठी सोमवारी हे निवासी डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात, आवारात टेबल-खुर्च्या मांडून रुग्णांना तपासणार आहेत. त्यामुळे सोमवारी बाह्यरुग्णसेवाही सुरू असतील. मात्र, रुग्णालयाच्या आत ही सेवा देण्यात येणार नसल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या मार्ड संघटनेच्या डॉ. आकाश माने याने दिली.आता आश्वासने नकोत, कृती हवीघटनेला दोन दिवस उलटून गेले तरीही केवळ बैठका सुरू आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणा डॉक्टरांवरील हल्ले कधी गांभीर्याने घेणार याच्या प्रतीक्षेत आहोत. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी फोनवर बोलणे झाले, त्यांनी सोमवारी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये अलार्म सिस्टीम, प्रत्येक विभागात सुरक्षारक्षक अशा विविध मागण्यांची निवेदने बºयाचदा आम्ही दिली आहेत. त्यामुळे यावर आता कृतिशील पावलांचीच गरज आहे, असे सेंट्रल मार्डचे डॉ. अमोल हेकरे म्हणाले.मागील दीड-दोन वर्षांपासून या सुरक्षेच्या मुद्द्यावरच्या मूलभूत अधिकारावर आम्ही लढतो आहोत. इतक्या कालावधीनंतरही केवळ कागदपत्रे, आश्वासनांची खैरातच पदरी पडत असेल, तर ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे आता आम्ही ठामपणे काहीच कृतिशील पाऊल उचलले जात नाही, तोवर काम बंद आंदोलनच सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.- डॉ. सारंग दोनारकर,अध्यक्ष, मार्ड संघटना, जे.जे. रुग्णालय

टॅग्स :डॉक्टरहॉस्पिटल