Join us

‘जेजे’तील निवासी डॉक्टर गेले संपावर, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार; लहानेंना हटवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 6:13 AM

नेत्र विभागप्रमुख आणि डॉ. तात्याराव लहाने यांना या विभागातून दूर करावे, या मागणीसह बेमुदत काळासाठी हा संप पुकारला आहे.

मुंबई : नेत्र विभागात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नियम पायदळी तुडविले जात असून वरिष्ठ डॉक्टर मनमानी कारभार करत असल्याची तक्रार निवासी डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेकडे करत बुधवारी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने संपाचे हत्यार उपसले. नेत्र विभागप्रमुख आणि डॉ. तात्याराव लहाने यांना या विभागातून दूर करावे, या मागणीसह बेमुदत काळासाठी हा संप पुकारला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले आहे. 

नेत्र विभागातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २८ निवासी डॉक्टरांनी डॉ. लहाने बेकायदेशीरपणे विभाग चालवत आहेत, तसेच डॉ. पारेख या असंसदीय शब्दाचा वापर निवासी डॉक्टरांना करत असल्याचा आरोप आहे. तसेच या विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना सर्जरी शिकविण्यात येत नसून यांचा परिणाम त्यांचा दैनंदिन शिक्षणावर होत आहे. वैद्यकीय आयोगाच्या नियमाप्रमाणे या विभागातील पदे भरली गेली पाहिजे. मात्र, तसे या विभागात झालेले नाही, असे मार्डचे म्हणणे आहे. बुधवारी सायंकाळी पाचनंतर पुकारण्यात आलेल्या संपामुळे रुग्णालयाच्या नियमित कामावर परिणाम झाला असून रुग्ण सेवा कोलमडली आहे. या सर्व निवासी डॉक्टरांनी महाविद्यालय परिसरात एकत्र येऊन घोषणाबाजी सुरू केली होती. 

काय आहेत मागण्या?      दोन्ही डॉक्टरांची नेत्र विभागातून तत्काळ बदली करा.          वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार विभागातील पदे भरा.        पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे तीन महिन्याचे थकीत विद्यावेतन द्यावे.         तिसऱ्या वर्षातील निवासी डॉक्टरांची थकीत देणी देण्यात यावी.

टॅग्स :हॉस्पिटलडॉक्टरमुंबई