मुंबई: गेल्या काही वर्षपासून राज्यातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड ) ,वसतिगृहाची संख्या वाढावा, विद्यावेतन केंद्रीय आरोग्य संस्थाप्रमाणे करा याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी करत आहे. या विषयावर सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , वित्त विभागाचे सहसचिव आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर संपावर ठाम असून बुधवारी संध्याकाळपासून ते संपावर जाणार असल्याचे त्यांनी काढलेल्या पत्रकात सांगितले आहे. संपाच्या काळात तात्काळ सेवा सुरु राहणार आहे.
निवासी डॉक्टरांनी या बैठकीत विद्यावेतन वाढवा आणि ते वेळेत द्या, नवे वसतिगृह बांधा, तसेच आहे त्या वसतिगृहाची डागडुजी करा या प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
याप्रकरणी राज्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ अभिजित हेलगे यांनी सांगितले कि, " आम्ही आमच्या मागण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत आहोत. सोमवारी आमची बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आम्ही आमच्या संपाच्या मुद्द्यावर कायम आहे. संपाच्या काळात तात्काळ सेवा सुरु राहणार आहे. राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालये असून ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आहेत. हे सर्वजण संपात सहभागी होणार आहे.