मुंबई: वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यलयातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी वेळेत न केल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर संघटना ( मार्ड ) गुरुवारी संध्याकाळापासून संपावर जाणार असल्याचे परिपत्रक काढून जाहीर केले आहे.
काही दिवसापूर्वी मार्ड संघटनेने त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संप करण्याची घोषणा केली होती. मात्र नियोजित संप सुरु करण्याच्या आधीच ७ फेब्रुवारी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात राज्यातील निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) मागण्यांसंदर्भात बैठक झाली. विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्याबरोबरच दर महिन्याच्या ठरावीक तारखेला नियमितपणे वेतन देण्याची ग्वाही देण्यात आली होती. तसेच वसतिगृह तातडीने दुरुस्त करणार असल्याचे डॉक्टरांना या वेळी सांगितले होते. मात्र हे आश्वासन देऊन सुद्धा पाळले गेले नसल्याचे निवासी डॉक्टर सांगत आहे.
त्यामुळे गुरुवार पासून राज्यातील निवासी डॉक्टर संध्याकाळापासून संपावर जाणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. या काळात तात्काळ विभागातील सर्व सेवा सुरु राहणार आहे. तसेच राज्यात सध्याच्या घडीला एकूण २५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यातील पदव्युत्तर अभ्याक्रम असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील निवासी डॉक्टर या संपात सहभागाची होणार आहे.