‘जे. जे.’तील निवासी डॉक्टरांचा संप कायम; मात्र, रुग्णव्यवस्थेवर फारसा परिणाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 07:30 AM2023-06-02T07:30:53+5:302023-06-02T07:32:25+5:30

जे. जे. रुग्णालयातील ७५० निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले असून गुरुवारी याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. 

Resident doctors strike in J j hospital continues there is not much impact on the patient system | ‘जे. जे.’तील निवासी डॉक्टरांचा संप कायम; मात्र, रुग्णव्यवस्थेवर फारसा परिणाम नाही

‘जे. जे.’तील निवासी डॉक्टरांचा संप कायम; मात्र, रुग्णव्यवस्थेवर फारसा परिणाम नाही

googlenewsNext

मुंबई :  जे. जे. रुग्णालयातील ७५० निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले असून गुरुवारी याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. 
रुग्णालयात संप असला तरी रुग्णव्यवस्थेवर फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, संप असाच सुरू राहिला तर गरीब रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.     

नेत्र विभागातील डॉक्टरांनी राजीनामे दिले असले तरी त्या विभागातील एका सहायक प्राध्यापकाने ओपीडीतील रुग्ण तपासण्याचे काम सुरू ठेवले  होते. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे, अशा रुग्णांना बुधवारी संध्याकाळीच  डिस्चार्ज देण्यात आला होता. संपूर्ण रुग्णालयातील ओपीडी  सकाळच्या वेळी संथगतीने सुरू होती. मात्र, आलेल्या सर्व रुग्णांना उपचार देण्यात आले. 

काय आहे प्रकरण ?
 गेल्या काही दिवसांपासून नेत्र विभागातील निवासी डॉक्टर विरुद्ध नेत्र विभागप्रमुख आणि माजी विभागप्रमुख असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. 
 या विभागात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नियम पायदळी तुडविले जात असून वरिष्ठ डॉक्टर मनमानी कारभार करत असल्याची तक्रार निवासी डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे. 

राजीनामा विहित नमुन्यात नाही
आठही डॉक्टरांचे राजीनामे प्राप्त झाले आहेत. मात्र, राजीनामे ज्या विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे ते तसे नाहीत. राजीनामे मागे घ्यावेत यासाठी सर्वांना गुरुवारी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, ते येऊ शकले नाहीत. संपामुळे रुग्णव्यवस्थेवर ताण येणार नाही, यासाठी अध्यापकांच्या मदतीने उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
डॉ. पल्लवी सापळे, 
अधिष्ठाता.

अधिष्ठाता खोटी माहिती पसरवत आहेत 
अध्यापकांचे राजीनामे मिळाले नाहीत असे आधी अधिष्ठाता सांगत होत्या. मात्र, आता मिळालेले राजीनामे विहित नमुन्यात नाहीत, असे त्या सांगत आहेत. याचा अर्थ ते चुकीची माहिती पसरवत असून धांदात खोटी माहिती देत आहेत. सहा महिन्यांत कुठल्याही विद्यार्थ्याला सर्जरी देता येत नाही. प्रत्येक निवासी डॉक्टरला टप्प्याटप्प्याने तीन वर्षांच्या कालावधीत शस्त्रक्रिया शिकवत असतो. त्यामुळे निवासी डॉक्टरही चुकीची माहिती देत आहेत.
डॉ. तात्याराव लहाने, 
माजी विभागप्रमुख

मागण्या  पूर्ण न झाल्यास राज्यभर संप
आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत संप पुकारणार आहोत. आम्हाला राज्याच्या  (सेंट्रल ) निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दर्शविला आहे. नेत्र विभागातील डॉक्टरांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीचे शास्त्रीय शिक्षण नेत्रविभागात मिळत नाही. 
डॉ. शुभम सोनी, 
अध्यक्ष, महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना.

माझ्यावर अन्याय  
माझा राजीनामा मी विहित नमुन्यात द्यायचा असेल तर तो देईन; परंतु माझ्या विरोधात असलेली चौकशी मला न बोलावताच पूर्ण करून तो अहवाल शासनाला सादर करणे म्हणजे माझ्यावर अन्याय आहे. 
डॉ. रागिणी पारेख, 
विभागप्रमुख, नेत्र विभाग

‘सनदी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करा’ 
राजीनामासत्रासंदर्भात विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. तसेच  मार्डच्या तक्रारीबाबत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यामार्फत सविस्तर चौकशी करावी, असे गोऱ्हे यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. 

चिंताजनक प्रकार 
राजीनाम्याचा प्रकार चिंताजनक आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. 
आ. छगन भुजबळ, माजी मंत्री

Web Title: Resident doctors strike in J j hospital continues there is not much impact on the patient system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.