Join us

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू; जे जे समूह रुग्णालयांना बसणार फटका

By संतोष आंधळे | Published: February 22, 2024 8:56 PM

येत्या रविवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होतील असे शासनातर्फे कळविण्यात आल्यानंतर सुद्धा निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्याने अखेर गुरुवार संध्याकापासून राज्यातील निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) आंदोलन सुरु करून सर्व डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईत जे जे समूह रुग्णलायतील रुग्णांना याचा फटका बसणार आहे.  या काळात तात्काळ विभागातील सर्व सेवा सुरु राहणार आहे. दरम्यान, येत्या रविवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होतील असे शासनातर्फे कळविण्यात आल्यानंतर सुद्धा निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालये चालविण्यासाठी निवासी डॉक्टरांची गरज असते. त्यांच्याविना रुग्णालये चालविणे प्रशासनाला अतिशय कठीण जाते. कारण निवासी डॉक्टर हा त्या रुग्णालयाच्या व्यवस्थेचा कणा असतो. त्यामुळे या निवासी डॉक्टरांनी संपावर गेल्यामुळे अनेकवेळा नियमित शस्त्रक्रिया करण्याचे काम पुढे ढकलावे लागते.

मुंबईत सध्या तरी जे जे समूह रुग्णालयाच्या अखत्यारीतील जे जे, जी टी, कामा आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयांना या संपाचा फटका बसणार आहे.कारण या रुग्णालयातील सुमारे १००० निवासी डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील निवासी डॉक्टर या संपात सहभागी नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून मार्डचे पदाधिकारी त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून पाठपुरावा करत आहे. त्यांनी आतापर्यंत वैद्यकीय शिक्षण संचालक, आयुक्त,सचिव, वैद्यकीय शिक्षण मंत्री , उपमुख्यमंत्री या सगळ्या सोबत बैठका घेतल्या आहेत. मात्र आश्वासना शिवाय त्यांच्या पदरी काही आलेले नाही.    

मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  चार दिवसापूर्वीच गुरुवार पासून राज्यातील निवासी डॉक्टर संध्याकाळापासून संपावर जाणार असल्याचा  इशारा दिला होता त्याप्रमाणे त्यांनी संप पुकारला आहेत. या काळात तात्काळ विभागातील सर्व सेवा सुरु राहणार आहे. तसेच राज्यात सध्याच्या घडीला एकूण २५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यातील पदव्युत्तर अभ्याक्रम असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील निवासी डॉक्टर या संपात सहभागाची होणार आहे.  

दुपारी तीनच्या बैठकीनंतर निर्णय

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ, तसेच ते वेळेत मिळावे आणि वसतिगृहे नवीन तयार करावी या प्रमुख मागण्यासाठी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मार्ड संघटनेचे पदाधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांमध्ये दुपारी तीन वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीनंतर संप चालूच ठेवायचा का मागे घ्यायचा याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :डॉक्टरसंपजे. जे. रुग्णालय