नायर दंत रुग्णालयात कामबंद आंदोलन, वसतिगृहात १० दिवसांपासून वीज नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:49 AM2024-04-16T09:49:35+5:302024-04-16T09:51:17+5:30
नायर दंत रुग्णालयातील नवीन इमारतीतील वसतिगृहाच्या मजल्यावर आग लागली होती.
मुंबई : नायर दंत रुग्णालयातील नवीन इमारतीतील वसतिगृहाच्या मजल्यावर आग लागली होती. या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाकरिता वसतिगृहातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांनी सोमवारी अचानक काम बंद केले. त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी लागलेल्या या आगीत काही खोल्या आणि वस्तू जळून खाक झाल्या होत्या. एका बाजूला शहरात तापमान वाढत असताना विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांचे दिवसभर हाल होत आहेत.
नवीन इमारतीत आग लागल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचे काम सुरू होते. ते काम पूर्ण होऊन विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात विद्युत पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. काही वेळ विद्यार्थ्यांनी काम बंद केले होते. मात्र त्याचा काही परिणाम रुग्णसेवेवर झाला नाही. कॅन्टीनमधील जेवण अनेक दिवस विद्यार्थी, डॉक्टर आणि कर्मचारी खात आहेत. त्याबाबत कुणाचीही तक्रार नाही - डॉ नीलम अंड्राडे, अधिष्ठाता, नायर दंत महाविद्यालय
१) निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी अचानक काम बंद केले. त्यामुळे काही काळ रुग्णालयात गोंधळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. मात्र, रुग्णालयात उपस्थित असलेल्या इतर डॉक्टरांनी रुग्णांना उपचार दिले. त्यामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला.
आदित्य ठाकरेंची टीका -
काम बंद आंदोलनाचा धागा पकडून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली. विद्यार्थ्यांना १० दिवस वीज आणि पाणी नाही. या इमारतीत काही खोल्या खाक झाल्या, अग्निप्रतिबंध सुरक्षा प्रणालीचे नियम पाळले का?, यांसह अनेक प्रश्न विचारले आदित्य यांनी उपस्थित केले. तसेच कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.