निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 09:11 AM2024-08-20T09:11:47+5:302024-08-20T09:12:24+5:30

रक्षाबंधनाचे औचित्य साधून राज्यातील विविध रुग्णालयांत डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकांना काळी राखी बांधून निषेध व्यक्त केला.

Resident doctors strike will continue | निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार

निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार

मुंबई :  राज्यातील निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाला सात दिवस पूर्ण झाले असून, मंगळवारी आठव्या दिवशीही ते सुरूच राहणार असल्याची भूमिका राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने जाहीर केली आहे. यावेळी रक्षाबंधनाचे औचित्य साधून राज्यातील विविध रुग्णालयांत डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकांना काळी राखी बांधून निषेध व्यक्त केला.

दरम्यान, दिल्लीतील निर्माण भवन येथे सोमवारी देशातील विविध मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्वा चंद्रा याच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील मार्ड संघटनेचे दोन पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, निवासी डॉक्टरांच्या मागण्यासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईतील पाचही प्रमुख रुग्णालयांत सोमवारी रक्षाबंधनानिमित्ताने रुग्णसंख्या कमी असली, तरी ओपीडी नियमितपणे सुरू होते. 
वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील अध्यापक  मंगळवारी निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनात सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आपला दवाखाना येथून २०० डॉक्टरांची कुमक मागविली होती.

केईएमच्या ओपीडीत १६१८ रुग्ण
रक्षाबंधनाचा दिवस असला, तरी के. ई एम. रुग्णालयात १६१८, सायन येथे १०१५, नायर रुग्णालयात ६७८, तर कूपर रुग्णालयात १३२७ रुग्णांना ओपीडीमध्ये उपचार देण्यात आले. अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू असल्यामुळे त्यामध्ये कोणतीही बाधा आलेली नाही.

आझाद मैदानात मुंबईकरांची निदर्शने 
आझाद मैदानात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या निदर्शनांमध्ये सोमवारी विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करावे, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

दिल्ली येथील बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांना आम्ही आमच्या मागण्या सांगितल्या. मात्र, यावेळी कोणतेही ठोस आश्वासन त्यांच्याकडून मिळालेले नाही. त्यामुळे आमचे काम बंद आंदोलन यापुढेही सुरू राहणार आहे.
- डॉ. प्रतीक देबाजे, 
अध्यक्ष, सेंट्रल मार्ड.

Web Title: Resident doctors strike will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.