प्रलंबित विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 05:27 AM2019-03-29T05:27:41+5:302019-03-29T05:27:57+5:30
राज्यातील शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी अखेर प्रलंबित विद्यावेतनाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई : राज्यातील शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी अखेर प्रलंबित विद्यावेतनाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार पत्रव्यवहार, मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना भेटूनही विद्यावेतन नियमित नसल्याने अखेर संयम संपून निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने काहीशा वेगळ्या शैलीत पत्र लिहून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पत्रात म्हटले आहे की, ‘संयम संपेपर्यंत वाट न पाहू नका, आम्ही भिकारी नाही,’ अशा गंभीर शब्दांत इशारा देण्यात आला आहे.
विद्यावेतनाच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टर आणि राज्य सरकार आमने-सामने आहेत. नागपूर, अकोला, अंबेजोगाई आणि लातूरच्या सरकारी रुग्णालयात आरोग्यसेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या काही महिन्यांपासून विद्यावेतन मिळत नाही. याविरोधात मार्डने आता राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. याबाबत सेंट्रल मार्डच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले की, नागपूर, अकोला आणि लातूर या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना मिळणारे विद्यावेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. एक हजार निवासी डॉक्टरांचे मानधन डिसेंबर २०१८ पासून मिळालेले नाही. अंबाजोगाईत तर गेल्या सात महिन्यांपासून विद्यावेतन नाही. काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला त्या वेळी निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने मानधन देण्याचे आदेश दिले होते.
सोमवारी गिरीश महाजन यांची भेट घेणार आहोत. या भेटीत मानधन वाढ आणि रखडलेले मानधन देण्याची विनंती करणार आहोत. ही विनंती मान्य न झाल्यास राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जातील, असा इशारा डोंगरेंनी दिला.