Join us

निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी मिळणार तातडीने चांगल्या खोल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 5:46 AM

‘लोकमत’च्या वृत्तानंतर महापालिका आणि शासन स्तरावर दिवसभर वेगवान बैठका

मुंबई :  ‘निवासी डॉक्टरांच्या होस्टेलपेक्षा कोंडवाडे बरे,’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांच्या होस्टेलचा प्रश्न ‘लोकमत’ने मंगळवारी मांडला आणि त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. तातडीने महानगरपालिका आणि शासन स्तरावर बैठका झाल्या आणि  मुंबई महापालिकेने ॲक्वर्थ हॉस्पिटलमध्ये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने एमटीएनएलच्या इमारतीत निवासी डॉक्टरांच्या राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला.  

महापालिकेचे केईएम, कूपर, सायन आणि नायर ही चार वैद्यकीय महाविद्यालये आणि शासनाच्या जे. जे. हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांना अत्यंत वाईट अवस्थेत राहावे लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने छायाचित्रासह प्रकाशित केले होते. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांच्या निवासाची अवस्था किती भयंकर आहे,  हे पाहून जनतेमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

‘लोकमत’शी बोलताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार म्हणाले, आम्ही निवासी डॉक्टरांसाठी ॲक्वर्थ रुग्णालयात नवीन वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय आजच घेतला आहे. त्याशिवाय हाजीअली येथील होस्टेलचे कामही तातडीने सुरू करण्यात येत आहे. नायर हॉस्पिटलच्या होस्टेलमध्ये फर्निचरचे काम सुरू केले जाईल. ‘लोकमत’ने जे मुद्दे मांडले त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, जे. जे. मधील निवासी डॉक्टरांच्या होस्टेलसाठी डोंगरी येथील एमटीएनलची इमारत पाहिली आहे. तेथे १३० खोल्या आहेत. त्यामुळे ती इमारत भाड्याने घेऊन तेथे सोय करण्यासाठी मुलांनी तयारी दर्शवली आहे. 

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले...

 जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टरांना येण्या-जाण्याची व्यवस्था केली जाईल. ज्या ठिकाणी होस्टेलच्या समस्या आहेत त्या ठिकाणी खासगी जागा भाड्याने घेऊन विद्यार्थ्यांची सोय केली जाईल. रुग्णालय परिसरात डॉक्टरांच्या क्वॉर्टर्स रिकाम्या असतील तर तेथे विद्यार्थ्यांची सोय करण्यात येईल. केंद्र सरकारकडे होस्टेलसाठी ५०० कोटींची मागणी केली आहे. तसेच सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने तातडीची गरज म्हणून जे. जे. रुग्णालयासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

टॅग्स :डॉक्टरसंप