मुंबईतली घरे दोन महिन्यांत महागली; किमतीत १९ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 09:35 AM2024-01-20T09:35:10+5:302024-01-20T09:36:25+5:30

तिमाहीत किमती वाढण्याचा विक्रम.

Residential flats in mumbai become expensive in two months 19 percent increase in price | मुंबईतली घरे दोन महिन्यांत महागली; किमतीत १९ टक्के वाढ

मुंबईतली घरे दोन महिन्यांत महागली; किमतीत १९ टक्के वाढ

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबई शहरांतील घरांच्या किमतीमध्ये तब्बल १९ टक्के वाढ नोंदली गेली आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडित कंपन्यांनी आकडेवारीच्या आधारे केलेल्या विश्लेषणाद्वारे ही माहिती मिळाली आहे. एकाच तिमाहीत मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर किमती वाढण्याचा हा विक्रम ठरला आहे. 

२०२३ या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबईमध्ये घर तसेच व्यावसायिक कार्यालयांची दमदार खरेदी झाली. २०२३ च्या वर्षात दीड लाखांच्या आसपास मुंबईत मालमत्तांची खरेदी झाली. यामध्ये ८० टक्के खरेदी ही घरांची झाली तर २० टक्के खरेदी ही व्यावसायिक कार्यालयांची झाली. 

नुकत्याच सरलेल्या २०२३ च्या वर्षात मुंबई व महामुंबई परिसरात एकूण १ लाख ५३ हजार ८७० घरांची विक्री झाली असून विक्रीच्या या विक्रमी संख्येमुळे देशाच्या रिअल इस्टेट उद्योगात मुंबईने अव्वल क्रमांक गाठला आहे. या विक्रमामुळे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला देखील मुंबईने लक्षणीय विक्री फरकाने मागे टाकले आहे. २०२३ या वर्षात दिल्लीमध्ये ६५ हजार ६२५ घरांची विक्री झाली आहे. 

वाढती मागणी, अपुरा पुरवठा:

वाढती मागणी, अपुरा पुरवठा याचा परिणाम मालमत्तांच्या किमती वाढण्याच्या रूपाने दिसून आला आहे. खरेदी करताना प्रामुख्याने लोकांना रेडी पझेशन घरे हवी होती. अनेक प्रकल्प निर्माणाधीन आहेत. त्यामुळेच मागणीच्या तुलनेत पुरवठ्यामध्ये तफावत आली आहे. 

२०२२ मध्ये कोरोनाचे सावट संपल्यानतंर २०२३ च्या वर्षामध्ये मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात मोठ्या प्रमाणावर तेजी निर्माण झाली. २०२३ मधील एखाद-दोन महिन्यांचा अपवाद वगळता बाकी सर्व महिन्यात प्रति महिना १० हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. 
२०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबई व महामुंबईत झालेली गृहविक्री ४० टक्क्यांनी अधिक ठरली. 

उपनगरांमध्ये नव्या प्रकल्पांना सुरुवात :

२०२२ मध्ये मुंबई व महामुंबई परिसरामध्ये १ लाख ९ हजार ७३० घरांची विक्री झाली होती. तर, २०२३ मध्ये मुंबई व महामुंबई परिसरात नव्या प्रकल्पांची सुरुवात देखील दणक्यात झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, या वर्षात १ लाख ५७ हजार ७०० नव्या घरांच्या निर्मितीचे प्रकल्प सुरू झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २७ टक्के अधिक आहे. २०२२ मध्ये १ लाख २४ हजार ६५० घरांच्या उभारणीचे प्रकल्प सुरू झाले होते.

Web Title: Residential flats in mumbai become expensive in two months 19 percent increase in price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.